जे. जे. रूग्णालयात एकाच रुग्णाला मिळताहेत वेगवेगळे केस पेपर नोंदीचे नंबर

93

राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील रुग्णांची संगणकीयकृत प्रणालीतून होणारी नोंद (केस पेपर नोंद) बंद झाल्याचा फटका रुग्णांच्या माहितीवर होऊ लागला आहे. राज्यातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या जेजे रुग्णालयात रुग्णांना केस पेपरवर दोन नोंदण्याचे क्रमांक मिळत असल्याचा गोंधळ गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळे उपचारांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

रुग्णांच्या नव्या नोंदणीत आणि तपासणी कागदावरील नोंदणी क्रमांकात भलताच क्रमांक लिहिला जात असल्याची तक्रार रुग्णांकडून वाढत आहे. 4 जुलैपासून राज्यभरातील सरकारी रुग्णालयात संगणकीय नोंदणी प्रणाली बंद असल्याने दिवसेंदिवस हा गोंधळ जास्त वाढू लागला आहे. जेजेत बाह्य रुग्ण विभागात आता गर्दी आवरणेही कठीण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. परिणामी बाह्य रुग्ण विभागात रुग्णांची गर्दी दुपारी एकनंतरही दिसून येत आहे.

चाचणी अहवालांना विलंब

जेजेत रक्त किंवा इतर तपासणीचा तपशील पूर्वी संगणकावर उपलब्ध केला जायचा. आता रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना थेट तपासणी केंद्रातून अहवाल घ्यावा लागत आहे. अहवालाला बराच विलंब होत असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. एक्स रे, एमआरआय आदी अहवाल त्वरित मिळण्यास विलंब होत असल्याने रुग्णांना तपासणीची प्रतिमा मोबाईलवर घेण्याचा सल्ला तंत्रज्ञाकडून दिला जात आहे. मात्र आर्थिक परिस्थिती हालाखीची असणाऱ्या रुग्णांकडे स्क्रिनटच मोबाईल असणे शक्य नाही, अशा रुग्णांची मोठ्या प्रमाणात परवड सुरु झाली आहे. अहवालच्या विलंबामुळे रुग्णांच्या उपचारांनाही विलंब होत असल्याचे चित्र जेजे रुग्णालयात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.