अवघ्या १४ दिवसांमध्ये ७१ जणांवर चेन पुलिंगप्रकरणी कारवाई

मुंबईत मागील ४ ते १७ जुलै २०२२ या कालावधीत अलार्म चेन पुलिंगच्या एकूण १२२ प्रकरणांची नोंद झाली आहे. यापैकी, १०२ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत आणि ७१ व्यक्तींवर भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अंतर्गत पुरेसे किंवा वैध कारणाशिवाय अलार्म चेन खेचल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे आणि यामध्ये ४२ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

चेन पुलिंगप्रकरणी कारवाई

मध्य रेल्वे अलार्म चेन पुलिंग (ACP- धोक्याची सूचना देणारी साखळी) प्रणालीचा गैरवापर रोखण्यासाठी आणि प्रवाशांना अलार्म चेन अनावश्यकपणे खेचू नये यासाठी जागरूक करण्यात येत असली तरी अनावश्यक चेन पुलिंग करून गाड्या थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उशीरा पोहोचणे, मधल्याच स्थानकांवर उतरणे/चढणे इत्यादी तकलादू कारणांसाठी प्रवासी एसीपीचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. मध्य रेल्वे अशा एसीपीच्या गैरवापर प्रकरणांवर बारकाईने नजर ठेवत आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये आरपीएफ, तिकीट तपासणी कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे आणि इतर रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांच्या तक्रारी तथा सहकार्यामुळे गुन्हेगाराला ताबडतोब पकडले जाते, परंतु काहीवेळा अज्ञात व्यक्तींवरही गुन्हे दाखलही केले जातात.

( हेही वाचा : बाजार समित्यांतही स्पर्धा; दरवर्षी क्रमवारी जाहीर होणार)

अनावश्यक/ तकलादू कारणांसाठी एसीपीचा सहारा घेऊ नका ज्यामुळे इतरांची गैरसोय होईल. अनावश्यक परिस्थितीत एसीपी करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे. आपली ट्रेन सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी टर्मिनस तथा स्टेशनवर पोहोचा, असे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.

पुरेशा कारणाशिवाय किंवा आणीबाणीशिवाय खेचलेली अलार्म साखळी केवळ त्या विशिष्ट ट्रेनच्या धावण्यावरच परिणाम करत नाही तर तिच्या मागे धावणार्‍या ट्रेनवरही कॅस्केडिंग प्रभाव पाडते. मुंबई विभागासारख्या उपनगरीय प्रणालीमध्ये यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या उशिराने धावतात. पुढे एका किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी एसीपीचा गैरवापर केल्याने इतर प्रवाशांची गैरसोय होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here