सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे बंद घरात तीन नाग पकडून डांबल्याचा प्रकार दोन जणांना चांगलाच अंगाशी आला. खब-याकडून माहिती मिळताच, वनाधिका-यांनी तिन्ही नागांची सूटका केली आणि आरोपींना ताब्यात घेतले. गेल्या आठवड्याभरात सांगलीत सरपटणारे प्राणी पकडण्याच्या तिस-या गुन्ह्याची नोंद या घटनेमुळे झाली.
सोमवारी वनविभागाने शुभम परीट यांच्या शेतात वापरात नसलेल्या घरामध्ये धाड टाकली. घरात तीन नाग दिसून येताच वनविभागाने त्यांना तातडीने ताब्यात घेतले. नागाची अवैधरित्या विक्री केल्याप्रकरणी चौकशीअंती चिकुर्डे येथील सागर यादव आणि आष्टा येथील संग्राम औघडे यांना वनविभागाने ताब्यात घेतले. ही कारवाई सांगली येथील वनविभागा (प्रादेशिक)च्या उपवनसंरक्षक निता कट्टे, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शिराळ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव, पलूस कडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण, इस्लामपूरचे वनपाल सुरेश चरापले, बावची अमोल साठे, बिळाशी येथील वनरक्षक सुरेश चरापले. वनरक्षक रायना पाटोळे, वनरक्षक सुनिल पवार यांनी ही कारवाई केली.
( हेही वाचा: अल्पावधीत ज्यांची आर्थिक स्थिती कित्येक पटीने वाढली, ते राऊतांच्या जवळचे लहान नेते कोण? )
नाग पाळणे, बाळगणे, विक्री करणे किंवा प्रदर्शन करणे हे भारतीय वन्यजीव संवर्धन कायद्यांतर्गत वनगुन्हा समजला जातो. हा प्रकार आढळल्यास १९२६ या वनविभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करा.
Join Our WhatsApp Community