साता-यातील कराडमधून अंदाजे तीन वर्षांच्या मादी बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले आहे. शनिवारी सकाळी बिबट्याला पिंज-यात बंद करण्यात वनविभागाला यश आले. या बिबट्याला पुण्यातील जुन्नरमधील माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात रवाना करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण ?
१६ नोव्हेंबर रोजी सातारा येथील कराडमधून येनके येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या बिबट्याने आईच्या डोळ्यांसमोर चार वर्षांच्या मुलाला बिबट्याने उचलले होते. आई-वडिलांचा ऊस तोडणीचा व्यवसाय असल्याने १६ नोव्हेंबर रोजी सकाळी शेतात दोघेही आपल्या मुलासोबत गेले होते, त्यावेळी बिबट्याने मुलावर हल्ला केला होता. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. या पिंज-यात शनिवारी २७ नोव्हेंबर रोजी बिबट्या अडकला.
(हेही वाचा आफ्रिकेअगोदरच जगभरात पसरलाय कोरोनाचा नवा विषाणू! आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची भीती)
अजून एका बिबट्याचा वावर?
येनके परिसरात अजून एका बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाच्या तपासणीत दिसून आले आहे. त्यामुळे गावक-यांनी सांभाळून रहावे, आवश्यक काळजी घ्यावी. वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे साताराचे मानद वन्यजीव रक्षक (वनविभाग) रोहन भाटे म्हणाले.
बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात सांभाळून रहा
- रात्रीच्या वेळी शक्यतो बिबट्याचा वावर असलेल्या भागांत भ्रमंती टाळावी.
- काही कारणास्तव घराबाहेर जायचे असल्यास हातात काठी आणि टॉर्च घ्यावी.
- रात्री जोरजोरात बोलत जावे किंवा मोबाईलवर मोठ्याने गाणे लावावे.
- कच-याचे योग्य नियोजन करावे. जेणेकरुन कुत्र्यांचा वावर कमी राहील. कुत्रा हे बिबट्याचे आवडते खाणे असल्याने बिबट्या कुत्र्याचा वावर असलेल्या भागांत जास्त दिसून येत असल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले आहे.
- प्रातःविधीसाठी जंगलपरिसरात जाणे टाळा. बिबट्या डोळ्यांना समांतर दिसणा-यावर हल्ला करतो. कित्येकदा बिबट्याला भक्ष्य हे कुत्रा किंवा बकरी असल्याचे वाटते त्यातून माणसावर हल्ले होतात. त्यामुळे लहान वयोगटातील मुलांना बिबट्याचा वावर असलेल्या भागांत नेणे धोक्याचे ठरते.