वन्य प्राण्यांविषयी तसेच वन्यजीव संवर्धनाच्या कायद्यांविषशी फारशी जागरुकता नसल्याचे, साता-यातील वनविभागाच्या कारवाईतून समोर आले आहे. एका व्यक्तीने चक्क आपल्या मिसळ सेंटरमध्ये पिंज-यात घार प्रदर्शनाला ठेवली. शेवटी वनविभागाला माहिती मिळताच घारीची वनाधिका-यांनी सुटका केली.
ग्राहकानेच दिली माहिती
साता-यातील वारुंजी फाट्या भागांत राऊमिसळमध्ये घार दिसत असल्याची माहिती ग्राहकानेच पुण्यातील मानद वन्यजीव रक्षकांना दिली. या मानद वन्यजीव रक्षकांनी तातडीने सातारा वनविभागाला माहिती दिली. घार हा वन्यजीव असल्याने तो पाळता येत नाही, ही माहिती देताच आरोपीनेच घार पिंज-यातून काढून वनविभागाला दिली.
म्हणून पिंज-यात ठेवली घार
घार दोन महिन्यांपूर्वी आरोपीला साता-यातच मिळाली होती. त्यावेळी तिला उडता येत नव्हते, म्हणून आरोपीने स्वतःजवळ ठेवून घेतले. आता घार चार महिन्यांची झाली आहे. ती आरोपीला ओळखते, त्याच्याकडून जेवणही घेते. मात्र वन्यजीव पाळणे हा गुन्हा असल्याने, वनविभागाने आरोपीविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती सातारा वनविभागा (प्रादेशिक)कडून माहिती दिली गेली.
( हेही वाचा :….म्हणून ‘त्या’ ओढत होत्या ट्रेनची साखळी, वाचून व्हाल हैराण! )
ही आहे शिक्षा
वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ अंतर्गत वाघ आणि बिबट्याप्रमाणेच घारीला पहिल्या वर्गवारीत संरक्षण दिले आहे. या आरोपाअंतर्गत आरोपीला सात वर्षांसाठी तुरुंगावास तसेच पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
Join Our WhatsApp Community