अब किसका नंबर आएगा? आता कोण अडकणार एनआयएच्या जाळ्यात?

हा बडा अधिकारी कोण असणार? याबाबत मात्र कोणीही स्पष्टपणे बोलत नाही.

141

अंटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने चकमक फेम माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक केली. त्यानंतर एनआयएच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात एक बडा अधिकारी अडकण्याची शक्यता असल्याची चर्चा पोलिस खात्यात दबक्या आवाजात सुरू आहे. वेळ पडल्यास शर्मा हे या बड्या अधिकाऱ्याच्या नावाचा खुलासा करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा बडा अधिकारी कोण असणार? याबाबत मात्र कोणीही स्पष्टपणे बोलत नाही. मात्र, लवकरच या अधिकाऱ्याचा नंबर लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

खरा सूत्रधार कोण?

अंटालिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने मुंबई पोलिस दलातील सचिन वाझे, सुनील माने, प्रदीप शर्मा, रियाजुद्दीन काझी या आजी-माजी अधिका-यांसह दहा जणांना अटक केली आहे. या सर्व प्रकरणाचे सूत्रधार सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा असल्याचा दावा एनआयएने केला असला, तरी यांचा देखील बोलवता धनी वेगळाच असल्याची चर्चा होत आहे. सुरुवातीला एनआयएने सचिन वाझे, सुनील माने, रियाजुद्दीन काझी, विनायक शिंदे आणि नरेश गोर या पाच जणांना अटक केली होती.

(हेही वाचाः अशी ‘पत्रं’ जी महाविकास आघाडीसाठी ठरली ‘विस्फोटक’!)

बोलविता धनी कोण?

या प्रकरणात सुरुवातीला प्रदीप शर्मा यांचे नाव देखील येत होते. मात्र शर्माचे थेट नाव घेण्याची, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी कोणाची हिम्मत होत नव्हती. मात्र दुसऱ्या फळीत अटक करण्यात आलेल्या संतोष शेलार आणि आनंद जाधव यांच्या चौकशीत प्रदीप शर्मा यांच्या नावाचा उल्लेख आला आणि एनआयएने प्रदीप शर्मा, मनीष सोनी आणि सतीश मोटेकरी यांना अटक करण्यात आली. शर्मा यांच्या अटकेनंतर मात्र या प्रकरणात अंतर्गत मोठ्या घडामोडी सुरू झालेल्या असून, या सर्व प्रकरणाचा बोलवता धनी आणखी वेगळाच असल्याचे बोलले जात आहे. हा बोलवता धनी नेमका कोण आहे? प्रदीप शर्मा यांच्याकडून चौकशीत बोलवता धनी असणाऱ्या बड्या अधिकाऱ्याचे नाव पुढे येईल का? याची प्रतीक्षा अनेकांना आहे.

(हेही वाचाः पुरावे जुळवण्यासाठी एनआयएने केली आरोपींची डीएनए चाचणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.