राँग साईड ड्राईव्ह; मुंबईत २० दिवसांत २१८३ गुन्हे दाखल

130

पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर वाहतूक विभागाने राँग साईड वाहने चालविणाऱ्या चालकांवर भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. मागील २० दिवसात एकट्या मुंबईत राँग साईड वाहने चालविणाऱ्या चालकाविरुद्ध २१८३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे, याचा अर्थ मुंबईत दररोज सरासरी ११० गुन्ह्यांची नोंद होत आहे. या गुन्ह्यात आरोपीला अटक न करता नोटीस देऊन सोडून दिले जात आहे.

कारवाई न करता थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश

मुंबईतील वाहतूक कोंडी, अपघात टाळण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त यांनी राँग साईड वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई न करता थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश वाहतूक विभागाला दिले होते. त्याच बरोबर मुंबईतील रस्त्यावर पडून असणारे खटारा वाहने जागेवरून हलवून रस्ता मोकळा करावा असेही आदेशात म्हटले होते. पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशानंतर मुंबई वाहतूक विभागाने ६ मार्चपासून ही कारवाई सुरू केली होती. मुंबईतील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

वाहनचालकावर गुन्हा सिद्ध झाला तर…

मागील २० दिवसात वाहतूक विभागाने विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत राँग साईडने वाहने चालविणाऱ्या २१८३ वाहन चालकांवर भारतीय दंड विधान कलम २६९, ३३६ (वाहनं बेदरकारपणे चालवून, स्वतःच्या तसेच इतरांच्या जिवीतास धोका उत्पन्न करणे) तसेच मोटरवाहन कायदा १८४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कलमातर्गंत वाहन चालकांना अटक न करता त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले. गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात सादर केल्यानंतर हा खटला न्यायालयात उभा राहिल्यानंतर वाहनचालकावर गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला न्यायालयाकडून दंडात्मक कारवाई, किंवा कैदेची शिक्षा देखील होऊ शकते.

खटारा वाहने ….

दरम्यान मुंबईतील रस्त्यावर बेवासररित्या पडलेल्या खटारा वाहनावर वाहतूक पोलिसांनी मुंबई महानगर पालिकेच्या मदतीने कारवाई करून मागील २० दिवसात ४,६८९ बेवारस खटारा वाहने टोइंग व्हॅनच्या साह्याने हटविण्यात आले असून रस्ते मोकळे करण्यात आलेली आहे. या वाहनांच्या मालकाचा शोध घेऊन त्यांना काही दिवसांची सवलत देण्यात येऊन त्यानंतर ही वाहने कायदेशीररित्या भंगारात काढली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.