मुंबई पोलीस दलात जागोजागी वाझे

133

अँटिलिया प्रकरणानंतर मुंबई पोलीस दलातील सचिन वाझेच्या कारनाम्यांची मोठी चर्चा झाली. मुंबई पोलीस दलात मागील काही महिन्यांमध्ये असे अनेक वाझे समोर आले असून त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच मुंबईतील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. अशा गैरकारभार करणाऱ्या वाझेसारख्या लोकांमुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी होत असल्याबाबतही अनेकजण चिंता व्यक्त करत आहेत.

२०२१ हे मुंबई पोलीस दलासाठी सर्वात वाईट वर्ष समजले जात आहे. २५ फेब्रुवारी रोजी देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबईतील निवासस्थान ‘अँटिलिया’ जवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्यानंतर मुंबई पोलीस दलात ज्या घडामोडी घडल्या त्याच्यामुळे मुंबई पोलीस दलाची शरमेने मान झुकली. बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला पुन्हा मुंबई पोलीस दलात घेण्यात आले आणि त्याने  पोलीस दलाला हादरूवून सोडणारे कृत्य केले. सध्या सचिन वाझे आणि त्याचे सहकारी अधिकारी तुरुंगात केलेल्या कृत्याची शिक्षा भोगत आहेत. सचिन वाझे जरी तुरुंगात गेला असला तरी मुंबई पोलीस दलातील आणखी बरेच सचिन वाझे मागील काही महिन्यांमध्ये समोर आले आहेत.

( हेही वाचा : राण दाम्पत्याचा पोलीस ठाण्यात झाला चांगला पाहुणचार  )

पोलीस दलात जागोजागी वाझे

मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात वाझे संबंधित खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस उपायुक्तांसह तत्कालीन पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक  यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एका महिला अधिकऱ्यासह दोन जणांना अटक देखील करण्यात आली होती.

आझाद मैदान वाहतूक विभागाच्या प्रभारी पोलीस निरिक्षक शीतल मालटे आणि पोलीस शिपाई तुषार चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२ जानेवारी रोजी अटक केली होती. ट्रॅव्हल्स मालकाकडे रस्त्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या बसेसवर कारवाई न करण्यासाठी दरमहा प्रत्येक वाहनामागे २ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. २८ जानेवारी रोजी डोंगरी पोलीस ठाण्यातील सपोनि. संजीव निबाळकर याच्यावर कारवाई करण्यात आली होती, एका मटक्याच्या धंदेवाल्याकडे त्याच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप निंबाळकर याच्यावर लावण्यात आला आहे.

लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील ३ अधिकारी १ शिपाई यांना अंगाडीया व्यवसायिक यांच्याकडे खंडणी मागितल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात पोलीस उपायुक्त यांचा देखील समावेश असून अद्याप पोलीस उपायुक्त यांना अटक करण्यात आलेली नाही.

अधिकाऱ्यांविद्ध तक्रार

एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाने एका व्यापाऱ्यांकडे बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी चक्क ३५ लाख रुपयांची मागणी केली होती. या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर या रकमेत वरिष्ठ निरीक्षक हे देखील वाटेकरी असल्याचे फिर्यादीच्या जबाबात समोर आले होते. दरम्यान आंबोली पोलीस ठाण्यातील एका पोलीस निरीक्षकाच्या विरोधात पोलीस आयुक्तांना अर्ज लिहून या अधिकाऱ्याने कारवाई न करण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याचसोबत खंडणी, भ्रष्टाचार प्रकरणात अनेक पोलीस अधिकारी यांची विभागीय चौकशी देखील सुरू आहे, या अधिकाऱ्यांविद्ध तक्रार अर्ज दाखल झालेले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.