गेल्या पाच वर्षांत मुंबईतील पालिका शासकीय रक्तपेढ्यांमध्ये तब्बल ४,७४२ युनिट रक्तसाठा वाया गेल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल ४ हजार युनिटपेक्षा जास्त रक्तसाठा हा मुदतबाह्य झाल्या कारणाने हा रक्त साठा वापरण्यायोग्य नसल्याचे सांगितले जात आहे. तर गेल्या पाच वर्षांपैकी कोरोना महामारीत म्हणजेच २०२० साली सर्वाधिक १,३२१ युनिट रक्तसाठा वाया गेल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. मुंबईत उन्हाळ्याच्या काळात रक्तसाठ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत असते. या काळात राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून रक्तदान शिबिरांसाठी सातत्याने आवाहन करण्यात येते. अशातच ही धक्कादायक माहिती समोर आल्याने चिंता वाढली आहे.
(हेही वाचा – पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा)
पालिकेच्या प्रमुख रक्तपेढ्यांमधील माहिती चिंता वाढवणारी
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत ५० हून अधिक रक्तपेढ्या तसेच अनेक रक्त साठवणूक केंद्रे आहेत. त्यातील सर्व शासकीय रक्तपेढ्या आणि पालिकेच्या प्रमुख रक्तपेढ्यांमधील ही माहिती अधिक चिंता वाढवणारी आहे. यामध्ये मुंबई शहर उपनगरातील पालिकेच्या केईएम, कूपर, सायन, नायर, भाभा, राजावाडी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या रक्तपेढ्यांचा समावेश आहे. याशिवाय, शासकीय विभागातील सेंट जॉर्ज रुग्णालय, जे.जे. महानगर रक्तपेढी, कामा इ. रक्तपेढ्यांतील ही माहिती आहे.
रक्ताचा साठा कसा केला जातो?
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबड्या पेशी (सीपीबीए) ३५ दिवस, तर ‘एसएजीएम’मध्ये साठविलेल्या तांबड्या पेशी ४२ दिवस २ ते ४ अंश तापमानाला साठवितात. प्लाइमा उणे ३० अंश तापमानाला १ वर्ष, तर प्लेटलेट्स २२ अंश तापमानाला ५ दिवस साठविता येतात. काही रक्तपेढ्यांमध्ये ‘रक्तघटक संकलन क्षमतेपेक्षा अधिक रक्त संकलित केले जाते व ते ठरावीक कालावधीत न वापरल्यामुळे वाया जाते. रक्ताचे एक युनिट ३५० मिली असते. तर, एक पीआरबीसी हे १७५.५ मिलीचे असते. सर्व रक्तपेढ्यांमध्ये हल्ली रक्ताचे विघटन हे तांबड्या पेशी, फ्रेश फ्रोझन प्लाइमा, प्लेटलेट्स आणि क्रायोप्रेसिपिटेट अशा चार घटकांत करतात. रक्तातील घटक विलग केल्यानंतर ते ठरावीक तापमानाला विशिष्ट कालावधीसाठी साठविले जातात.
Join Our WhatsApp Community