मुंबईत ‘डिटेक्शन रेट’ घटला! जाणून घ्या काय आहे कारण?

मुंबईत मागील तीन महिन्यांत गुन्ह्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, मात्र गुन्ह्यांची उकल (डिटेक्शन रेट) कमी झाली आहे. मागील तीन महिन्यांत मुंबईत १३ हजार ६०४ गुन्हे दाखल झालेले असून केवळ ९ हजार ४४५ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. शहरातील गुन्हेगारी दर वाढण्यामागे आणि गुन्ह्याची उकल होण्यात घट होण्यामागचे कारण म्हणजे राज्यात सुरू असलेला हनुमान चालीसा, धार्मिक स्थळावरील भोंग्याचा वादामुळे पोलीस यंत्रणेवर ताण पडत असल्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्याच्या संख्येत घट झाल्याचे एका पोलीस अधिकारी यांनी सांगितले.

…म्हणून पोलिसांना सतर्क रहावे लागत आहे

मुंबईसह राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याचा ताण सरकारी यंत्रणेवर पडत आहे, सर्वात अधिक ताण पोलीस यंत्रणेवर असून शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांना सतर्क रहावे लागत आहे. गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे, गुन्हेगारी रोखणे, गुन्ह्यांची उकल करणे इत्यादी कामापेक्षा पोलीस यंत्रणेला राजकीय सभा, विविध अभियान, आंदोलने मोर्चे सांभाळावे लागत आहे. नाकाबंदी, बंदोबस्त करून पोलीस यंत्रणा थकून जात आहे. या सर्व कारणामुळे मुंबईत गुन्हेगाराचे फावले आहे.

इतर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपयश

१ जानेवारी ते ३१ मार्च २०२२ या तीन महिन्यांच्या कालावधीत मुंबईत २९ जणांच्या विविध कारणातून हत्या करण्यात आलेल्या आहेत. या सर्व हत्येची १०० टक्के उकल करण्यात पोलिसांना यश आले असले तरी इतर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना पूर्णपणे यश आलेले नाही. चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, वाहन चोरी, सोनसाखळी चोरी इत्यादी गुन्ह्यांत भयंकर वाढ झालेली असून गुन्ह्याची उकल मात्र ५० ते ७५ टक्केच झाली आहे. मागील तीन महिन्यांत महिलांवरील गुन्ह्यात देखील थोडीफार वाढ झालेली असून त्यापैकी ७५ टक्केच गुन्ह्याची उकल झालेली आहे.

केवळ ९,४४५ गुन्ह्यांची उकल

१ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ मध्ये सर्व मिळून १० हजार १७५ गुन्हे मुंबईत घडले होते तर ६ हजार ३३३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते तर या वर्षी मागील तीन महिन्यात १३ हजार ६०४ गुन्हे दाखल झालेले असून केवळ ९ हजार ४४५ गुन्हयाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here