अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात एकाने एकापाठोपाठ एक 14 हिंदू महिलांवर हल्ले करुन त्यांचे दागिने पळवले. लाथन जाॅन्सन (37) असे या आरोपीचे नाव आहे. साडी किंवा अन्य पारंपारिक भारतीय पोषाख घातलेल्या, कपाळावर टिकली लावलेल्या आणि दागदागिने घातलेल्या महिलांना तो लक्ष्य करत होता. याप्रकरणी त्याच्यावर हेट क्राइमचा आरोप ठेवण्यात आला आहे.
हा आरोपी ज्येष्ठ हिंदू महिलांवर हल्ले करुन त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पोबारा करायचा. जूनपासून त्याचा हा प्रकार सुरु होता, अशी माहिती सांता क्लारा काउंटीच्या जिल्हा अॅटर्नी कार्यालयाने दिली. आरोपीने केलेल्या हल्ल्यात अनेक महिला जखमी झाल्या होत्या. आरोपीने एका महिलेला धक्का देऊन जमिनीवर पाडले व तिच्या पतीच्या चेह-यावर ठोसा लगावला. त्यानंतर महिलेच्या गळ्यातील हार हिसकावून तो कारने पसार झाला. त्याच्या हल्ल्यात अन्य एका महिलेचे मनगट मोडले. यातील बहुतांश महिलांचे वय 50 ते 73 वर्षादरम्यान आहे.
( हेही वाचा: नाशिक बस दुर्घटनेवर पंतप्रधानांनी व्यक्त केली हळहळ; मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर )
कडक कारवाई करणार
जाॅन्सन या आरोपीने पळवलेल्या दागिन्यांचे मूल्य 35 हजार डाॅलर आहे. ज्या महिलांवर हल्ले झाले त्यातील जवळपास सर्वच महिलांनी साडी किंवा त्या प्रकारचा अन्य पारंपारिक पोषाख परिधान केलेला होता. याबाबत खटला चालवून एक मजबूत संदेश देऊ, असे हिंदू अमेरिकन फाउंडेशनचे सदस्य समीर कालरा यांनी म्हटले आहे.