भाजपच्या खासदारांनी महापालिका शाळेबाबत केले ‘हे’ विधान!

107

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थी गळती आणि शिक्षणाचा दर्जा याबाबत सातत्याने टीका करणाऱ्या भाजपच्या एका खासदाराने तर आता या शाळांचे गोडवेच गायले आहे. महापालिका शाळेत तर याच आणि आपले पैसे वाचवून त्यातून उच्च शिक्षण घ्या असा संदेश भाजपाच्या मुखातून बाहेर पडला असून त्यांच्या आवाहनानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि शिक्षकांना स्वतःलाच चिमटे काढून आपण स्वप्नात तर नाही ना हे जाणून घ्यावे लागले.

मुंबई पब्लिक स्कूलचे लोकार्पण

मालाड पश्चिम परिसरातील वळणई वसाहत परिसरात नव्याने मुंबई पब्लिक स्कूल उभारण्यात आले. या सुसज्ज सहा मजली शालेय इमारतीचे लोकार्पण उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या शुभहस्ते शनिवारी झाले. या कार्यक्रमाला स्थानिक कॉंग्रेसचे आमदार अस्लम शेख, शिक्षणाधिकारी राजू तडवी, पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, माजी शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार , नगरसेविका सेजल देसाई आणि मान्यवरही उपस्थित होते.

(हेही वाचा – सरकारी अधिकारी व्हायचंय? MPSC मार्फत रिक्त पदांची भरती ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार)

यावेळी बोलतांना गोपाळ शेट्टी यांनी, खासगी शाळेत प्रवेश घेण्याऐवजी महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घ्या आणि त्यामुळे जे पैसे वाचतील, ते बँकेत ठेवून भविष्यात उच्च शिक्षणासाठी उपयोगात आणा, असे आवाहन उपस्थित पालकांना आणि जनतेला केले. शेट्टी म्हणाले, मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका विविध शाळांच्या माध्यमातून उत्तमोत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा देखील मुंबईकरांना प्रदान करीत असते. याच शैक्षणिक सुविधा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी महापालिकेच्या शालेय इमारती आणि शैक्षणिक संकुले विविध स्तरीय सुविधांसह कार्यरत आहेत. याच शृंखलेत आता आणखी एका अत्याधुनिक आणि आकर्षक इमारतीची भर पडली आहे.

या शाळेतील सेवा सुविधांबाबत बोलताना सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले की, या नवनिर्मित ६ मजली (तळ अधिक पाच मजले) शालेय इमारतीचा लाभ हा ३ माध्यमातील व ४ शाळांमधील सुमारे ६०० विद्यार्थ्यांना होईल. तसेच या शाळेत अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, सुसज्ज ग्रंथालय, भव्य सभागृह आणि विविध खेळांच्या सरावांसाठी विस्तीर्ण क्रीडांगण असल्याचेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.