आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो वारकरी हे वर्षानुवर्षे वारी करत जात असतात. आपल्या पांडुरंगाला भेटल्यानंतर एक वेगळंच समाधान या सर्वांच्या चेह-यावर असतं. चंद्रभागेच्या किनारी वसलेल्या पंढरपूरच्या विठोबाचं आजवर अनेक दिग्गजांनी दर्शन घेतलं आहे.
स्वंतत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे सुद्धा विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत घडलेल्या एका किस्स्याची आठवण पंढरपूरच्या विठोबाचे परंपरागत पुजारी अॅड. आशुतोष बडवे यांनी हिंदुस्थान पोस्टला सांगितली आहे.
नेहरू ठेचकाळले
1953 साली पंतप्रधान असताना जवाहरलाल नेहरू हे पंढरपूरात आले होते. त्यावेळी विठोबाच्या देवळातील गाभा-यात जाण्यासाठी एक दगडी उंबरा ओलांडून जावे लागत असे. नेहरुंचे वय झाले असल्यामुळे हा दगडी उंबरा ओलांडून जाताना त्यांना त्रास झाला आणि ते त्या उंब-यावर ठेचकाळले.
दगडी उंबरा काढला
या उंब-यामुळे गर्दीच्या वेळी देखील भाविकांना आत-बाहेर जाणे अवघड होत होते. त्यामुळे मग मंदिर प्रशासनाकडून पुरातत्व विभागाशी याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर दर्शनाला येणा-या वयस्कर भाविकांना देखील विनासायास देवळाच्या गाभा-यात जाऊन दर्शन घेता यावं, या हेतूने हा दगडी उंबरा काढून टाकण्यात आला. हा उंबरा काढण्यामागे काही अपशकून असल्याच्या कथा देखील सांगण्यात येतात, पण त्यामागील हे खरं तर्कशुद्ध कारण असल्याचे सांगितले जाते.
(हेही वाचाः समाजवाद्यांनी विठ्ठलाच्या शासकीय पूजेला विरोध केला आणि मग जे झालं त्याने…)
Join Our WhatsApp Community