आयकर विभागाची धाड! उत्तर प्रदेशासह महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी छापे

80

प्राप्तिकर विभागाने 31 डिसेंबर 2021 रोजी परफ्युम उत्पादन आणि बांधकाम व्यवसायात गुंतलेल्या दोन समूहांवर शोध आणि जप्तीची कारवाई केली. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि गुजरात राज्यातील 40 हून अधिक परिसरात शोधमोहीम राबवली गेली. मुख्यतः मुंबई आणि उत्तर प्रदेशातील पहिल्या समूहाच्या बाबतीत, शोध मोहिमेत असे दिसून आले की हा समूह परफ्युमची विक्री कमी झाल्याचे दाखवून, साठ्यामध्ये हेराफेरी करून, करपात्र उत्पन्नातून नफा करमुक्त उत्पन्नात वळवण्यासाठी खातेवहीत फसवेगिरी करून, वाढीव खर्च दाखवून कर चुकवेगिरीत सामील आहे. बोगस खरेदी बिले दाखवून 5 कोटी रुपयांपर्यंतची अफरातफर केल्याचे पुरावे आढळले आहेत.

(हेही वाचा – कॉर्डिलिया क्रूझवर कोरोनाचे ‘एंटरटेनमेंट’)

दोषी पुराव्यांच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की त्यामुळे निर्माण झालेले बेहिशेबी उत्पन्न मुंबईतील विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये, भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या दोन्ही देशांतील मालमत्ता संपादनात गुंतवले आहे. या समूहाने विक्रीसाठी असलेल्या मालाचे संबंधित उत्पन्न लपवून ते भांडवल म्हणून दाखवून 10 कोटी रुपयांची कर चुकवेगिरी केल्याचेही निष्पन्न झाले आहे. या समूहाने सेवानिवृत्त भागीदारांना देय लाभापोटीचे 45 कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केलेले नाही.

9.40 कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी रोकड जप्त

हे देखील उघड झाले आहे की संयुक्त अरब अमिराती मधील समूहाच्या एका कंपनीने कथितपणे 16 कोटी रुपये समूहाच्या एका भारतीय कंपनीमध्ये बाजार मूल्यापेक्षा अधिक प्रीमियम दाखवून अवैध शेअर भांडवल सादर केले आहे. या प्राप्तकर्ता समूह कंपनीने कोलकाता स्थित काही बनावट संस्थांकडून बेकायदेशीर भाग भांडवलाच्या रूपात 19 कोटी रुपये प्राप्त केले आहेत. आत्तापर्यंत 9.40 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोकड आणि 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बेहिशोबी दागिने जप्त करण्यात आले आहेत. अनेक बँक लॉकर्स प्रतिबंधित करण्यात आले असून ते अद्याप तपासायचे आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.