कोविड काळातील साहित्य खरेदीसह जंबो कोविड सेंटर आणि कोविड सेंटर उभारणीवर झालेला खर्च तसेच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या मालमत्तेसंदर्भात आयकर विभागाने केलेल्या झाडाझडतीनंतर याची इत्यंभूत माहिती आता आयकर विभागाने मागवली आहे. त्यामुळे ही कोविड काळासह २०१८पासूनची आजमितीस केलेल्या विकासकामांवरील तसेच साहित्य खरेदीवर केलल्या कामांची माहिती महापालिकेच्या प्रत्येक विभागामार्फत संकलित केली जात आहे. महापालिकेची २४ प्रशासकीय कार्यालयांसह सर्व खाती व विभागांना आयकर विभागाने कामाला लावल्याने प्रत्येक कर्मचारी माहिती संकलित करण्यात गढलेला पाहायला मिळत आहे.
मंजूर कामांची माहिती मागवली
माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या मालमत्तेची तपासणी आयकर विभागाच्या माध्यमातून करण्यात आल्यानंतर आयकर विभागाने इक्बालसिंह चहल यांना महापालिका आयुक्त म्हणून नोटीस पाठवून सन २०१८पासून ते आजमितीपर्यंतच्या मंजूर कामांची माहिती मागवली आहे.ज्या ज्या कंत्राटदारांना १ एप्रिल २०१८पासून२ मार्च २०२२ पर्यंत कंत्राट कामे देण्यात आली आहेत त्यासंदर्भातील माहिती आयकर विभागाने मागवली आहे. त्यानुसार मागील शुक्रवारी आयुक्तांच्या आदेशानंतर माहिती व तंत्रज्ञान विभाग, लेखा विभाग आणि महापालिका चिटणीस या तीन विभागांमार्फत कामाला सुरुवात झाली.
त्यानंतर सोमवारी अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी सर्व विभाग व खातेप्रमुख, सर्व प्रशासकीय कार्यालयांचे सहायक आयुक्त, उपायुक्त यांची बैठक बोलावून सर्वांना सूचना दिल्या. त्यानुसार प्रत्येक विभागांनी कामाला सुरुवात केली. माहिती व तंत्रज्ञान विभाग व लेखा विभागाच्या अधिपत्याखाली आयकर विभागाला अभिप्रेत असलेली सर्व माहिती संकलित केली जात आहे. मात्र, त्यानंतरही काही विभागांनी माहिती न दिल्याने बुधवारी पुन्हा सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी पुन्हा एकदा प्रत्येक विभागांच्या प्रमुखांना समज देत त्वरीत माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आयकर विभागाला देण्यात येणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने महापालिकेचा प्रत्येक विभाग कामाला लागल्याचे चित्र सध्या महापालिकेत दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community