महाराष्ट्रात प्राप्तिकर विभागाची शोधमोहीम; 5 कोटींहून अधिक अघोषित मालमत्ता जप्त

154

वाळू उत्खनन, साखर उत्पादन, रस्ते बांधकाम, आरोग्यसेवा, वैद्यकीय महाविद्यालय चालवणे इत्यादी व्यवसायात असलेल्या दोन समूहांशी संबंधित ठिकाणी प्राप्तिकर विभागाने 25 ऑगस्ट रोजी शोधमोहीम राबवून जप्तीची कारवाई केली. या शोध मोहिमेत महाराष्ट्रातील सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या 20 हून अधिक ठिकाणांचा समावेश आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

( हेही वाचा : माऊंट मेरीच्या जत्रेसाठी बेस्टच्या अतिरिक्त बसेसची सुविधा)

करचुकवेगिरीच्या विविध कार्यपद्धती उघड

या शोधमोहिमेदरम्यान, कागदपत्रांच्या स्वरूपातील दस्तावेज आणि डिजिटल डेटाच्या रूपात मोठ्या प्रमाणात गुन्ह्याशी संबंधित पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या पुराव्यांवरून या समूहाने अवलंबलेल्या बनावट खर्चाच्या नोंदी , अघोषित रोख विक्री, कोणतीही स्पष्टता नसलेल्या कर्जाच्या नोंदी यासारख्या करचुकवेगिरीच्या विविध कार्यपद्धती उघड झाल्या आहेत. वाळू उत्खनन आणि साखर उत्पादनात असलेल्या समूहाच्या बाबतीत, साखरेच्या 15 कोटीं रुपयांपेक्षा अधिक बेहिशेबी रोख विक्रीचे कागदोपत्री पुरावे सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत. या समूहाने आपले बेहिशेबी उत्पन्न आपल्या खातेवहीत बनावट असुरक्षित कर्जाच्या रूपात सादर केल्याचे या जप्तीच्या कारवाईत आढळले आहे. या समूहाने जमा केलेली 10 कोटी रुपयांहून अधिक बेहिशेबी रोकड अशा प्रकारे त्यांच्या खातेवहीत वळवण्यात आल्याची कबुली समूहाच्या अनेक कर्जदात्यांनी तसेच समूहाच्या प्रवर्तकांनी दिली आहे.

5 कोटींहून अधिक अघोषित मालमत्ता जप्त

नॉन-फायलर कॉर्पोरेट कंपनीने मालमत्ता विकून सुमारे 43 कोटी रुपये भांडवली नफा मिळवल्याचे पुरावेही जप्त करण्यात आले आहेत. आरोग्यसेवा आणि वैद्यकीय महाविद्यालय चालवण्याच्या तसेच रस्ते बांधणीच्या व्यवसायात असलेल्या दुसऱ्या एका समूहामध्ये, कॅपिटेशन फी दर्शविणाऱ्या अघोषित रोकड पावत्यांचे आणि डॉक्टरांना दिलेले वेतन आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलेले विद्यावेतन यांचा परतावा यांचे पुरावे आढळले आहेत. बनावट खर्चाची नोंद आणि कंत्राटी देय इत्यादीबाबत पुरावे सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत. या समूहाचे अशाप्रकारचे अघोषित उत्पन्न 35 कोटी रुपये इतके असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आतापर्यंत, शोध कारवाईमुळे 100 कोटींहून अधिक बेहिशेबी उत्पन्न सापडले असून याशिवाय 5 कोटींहून अधिक अघोषित मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.