अनेक ठिकाणी देशभरात प्राप्तिकर विभाग म्हणजेच आयकर विभागाचे धाडसत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच BBC च्या दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली. आयकर विभागाच्या कारवायांमुळे विरोधक नेहमीच सत्ताधारी पक्ष भाजपवर टीका करत असतात. मात्र, आयकर विभाग छापे टाकतो म्हणजे नेकमे काय करतो, त्याची तयारी कशी केली जाते? ते आज जाणून घेऊया.
आयकर विभाग आयकर कायदा 1961 च्या कलम 132 अंतर्गत कोणतेही सर्वेक्षण, छापा टाकतो. हा कायदा करपात्र उत्पन्न, कर दायित्व, अपील, दंड आणि खटला संदर्भात आहे. या कायद्यात प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांचे अधिकार आणि कर्तव्येही परिभाषित करण्यात आली आहेत. या कायद्यात वेळोवेळी सुधारणाही करण्यात आल्या आहेत.
आयकर विभाग का टाकतो छापे?
आयकर विभाग देशाच्या अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो. हा विभाग आयकरात फसवणूक करणा-या लोकांना शोधून काढतो. म्हणजे ज्या लोकांचे उत्पन्न आणि करात फरक आहे किंवा ज्या लोकांवर करचुकवेगिरीचा संशय आहे किंवा ज्यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता किंवा काळा पैसा असल्याची गुप्त माहिती असते, अशा सर्व प्रकरणात आयकर विभाग छापे टाकतो.
आयकर विभाग अशी करते छापेमारी
- जेव्हा आयकर विभाग एखाद्या ठिकाणी छापे मारण्याची योजना आखतो तेव्हा त्याची माहिती अतिशय गुप्त ठेवली जाते. थोडक्यात ज्या ठिकाणावर छापेमारी होणार आहे, ते सावध होऊ नयेत म्हणून गुप्तता बाळगली जाते.
- छापेमारी करताना आयकर विभाग सर्व वाॅरंट सोबत आणते. पहाटे किंवा रात्री उशिरा हा छापा टाकला जातो. तसेच, छापे टाकण्यावेळी पोलिसांचे एक पथकही आयकर विभागाच्या अधिका-यांसोबत असते.
- छापा टाकलेल्या ठिकाणी उपस्थित असणा-या सर्व व्यक्तींचे फोन आयकर विभाग जप्त करते. त्यानंतर छापा टाकलेल्या संबंधित ठिकाणाची सर्व दारे, खिडक्या बंद केल्या जातात. कोणालाही आत येता येत नाही, अथवा आतून कोणीही बाहेर जाऊ शकत नाही.
- छापा टाकलेल्या ठिकाणी असलेली रोख रक्कम, दागिने आणि मौल्यवान वस्तूंची खाती आणि कागदपत्रे तपासली जातात. आवश्यकता असेल तर आयकर विभाग त्या वस्तूंसंबंधीतील कागदपत्रेही सोबत घेऊन जाते. छापेमारीत जर रोख रक्कम वा दागिने सापडले आणि त्याचा हिशोब त्या व्यक्तीकडे असेल तर अधिकारी ते जप्त करत नाहीत.
- छापेमारी करत असताना जर कोणी आयकर विभागाच्या अधिका-यांना विरोध केला तर त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. जेथे छापे टाकले जातात, तेथे अधिकारी उपस्थित सर्व लोकांना त्यांच्या नात्याबद्दल विचारतात. सर्व मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे मागवली जातात. संबंधित व्यक्तीकडे लाॅकर असेल तर त्याची चावीही द्यावी लागते.
- छापेमारीदरम्यान, उपस्थित असलेल्या व्यक्तीला कोणतेही कागदपत्रे फाडण्याचा किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करु शकत नाही. कारवाईदरम्यान, उपस्थित अधिका-यांच्या प्रश्नांनानी त्याला उत्तरे द्यावी लागतात. तसे न केल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते.
- आयकर विभागाच्या पथकाला जर मोठ्या गडबडीचे पुरावे मिळाले किंवा संशय आल्यास आयकर अधिकारी कडक कारवाई करु शकतात. अशावेळी माहिती गोळा करण्यासाठी आयकर विभाग संबंधित ठिकाणचे कुलूप तोडणे, भिंत पाडणे अशा प्रकारची कारवाई करु शकतात.