महाराष्ट्रात मुसळधार पाऊस! अनेक नद्यांनी ओलांडली पातळी, 27 गावांचा तुटला संपर्क

115

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे कोकणातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नद्यांचे पाणी ग्रामीण व शहरी भागात शिरले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने २७ गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने आतापर्यंत 1500 हून अधिक लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. यासह एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या जवानांकडून कोकण आणि मुंबईत मदतकार्य सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी मुख्य सचिव आणि जिल्हा दंडाधिकार्‍यांना पावसात अडकलेल्या लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी नेण्याचे आदेश दिले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये एनडीआरएफचे २५ जवान मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी खाजगी बचाव पथकेही काम करत आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी काही संस्थाना सज्ज राहण्यास सांगितले आहे.

(हेही वाचा – Alert! पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस, मुख्यमंत्री शिंदेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश)

नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हावर

मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणातील 12 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून राज्यातील इतर 24 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, चिपळूण, मंडणगड आणि खेड परिसरातील सखल भाग पाण्याखाली गेला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हावर पोहोचली आहे. येथील काजळी आणि वाशिष्ठी नद्यांही धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत. प्रशासनाने नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

एनडीआरएफच्या ५ तुकड्या मुंबईत तैनात

कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत एका रात्रीत सात फुटांनी वाढ झाली आहे. मुंबईत सोमवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. किंग सर्कल, धारावी, सायन सर्कल, गांधी मार्केट, लालबागसह मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. एनडीआरएफच्या ५ तुकड्या मुंबईत तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेचे कर्मचारी पंप लावून पाणी उपसण्याचे काम करत असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.