Independence Day : चारही दिशांच्या सीमांचे रक्षण भारतासमोरचे आव्हान!

153
Independence Day : चारही दिशांच्या सीमांचे रक्षण भारतासमोरचे आव्हान!
  • ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन

भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनाच्या एक आठवडा आधी भारतासाठी चिंताजनक घटना घडली आहे. भारताचे मित्र-राष्ट्र बांगलादेशात पाकिस्तानने अराजक माजवले. त्यामुळे तेथील पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळावे लागले. तेथील हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरु झाले आहेत. अशा परिस्थितीत भारताची बांगलादेशाकडील सीमा अशांत झाली आहे. आधीच भारताची पाकिस्तानकडील, दुसरीकडे चीनकडील सीमा अशांत आहे, त्यात आता बांगलादेशाकडील सीमेची भर पडली आहे. या चारही दिशांकडील सीमांचे रक्षण करणे हे भारतासमोरचे आव्हान बनले आहे. (Independence Day)

(हेही वाचा – Independence Day : ‘लाँग वीकेंड’ची पद्धत पहिल्या स्वातंत्र्यदिनापासूनची?)

…म्हणून पाकच्या दहशतवादी कारवाया वाढल्या

गेल्या काही दिवसांपासून जम्मू, पुंछ, उदमपूर, राजौरी येथे दहशतवादी हल्ले होऊ लागले आहेत. हे हल्ले सैन्यावर होत आहेत. पूर्वी हे हल्ले काश्मीर खोऱ्यामध्ये होत होते. त्यात हिंदू, महिला किंवा पर्यटक यांना सॉफ्ट टार्गेट केले जात होते. आता हे हल्ले जम्मूमध्ये सैन्यावर होत आहेत. त्याची किंमत भारतीय सैन्याला भोगावी लागत आहे. जम्मूतील दक्षिणेच्या भागात हे हल्ले वाढले आहेत. त्या ठिकाणी २० ते २५ हजार राष्ट्रीय रायफल्सची तुकडी तैनात होती. या भागातील दहशतवाद संपल्यामुळे त्यांना तेथून हलवण्यात आले आणि त्यांना भारत-चीन लडाख सीमेवर तैनात करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी पोकळी निर्माण झाली. म्हणून पाकिस्तानने तिथे कडवे दहशतवादी पाठवले आहेत. यामध्ये पाकिस्तानी सैन्यातील निवृत्त कमांडर, ऑफिसर किंवा तालिबानी दहशतवादी यांचा समावेश आहे. म्हणून त्यांच्यात लढाई करण्याची क्षमता जास्त आहे.

आताच पाकिस्तान दहशतवादी कारवाया का वाढवल्या आहेत, यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पाकिस्तानला वाटते की, सध्याचे जे भारताचे सरकार आहे ते कमजोर झाले आहे. अशा वेळी दहशतवादी कारवाया करून काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणायचा. नुसते भारतातच नव्हे तर जगातही गोंधळाचे वातावरण आहे. नुकतेच अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. त्याशिवाय युक्रेन, हमास यांचे युद्ध सुरु आहे. अशा प्रकारे जगात ४५ ठिकाणी छोटी-मोठी युद्धे सुरु आहेत. यात कोण कुणाशी लढत आहे, हेच कळत नाही. त्यामुळे सगळे मोठे देश स्वतःचे संरक्षण करण्यातच गुंतले आहेत. इतर देशात काय घडतेय याविषयी त्यांना काहीही पर्वा नाही. याशिवाय पाकिस्तानला नुकतेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधून निधी मिळाला आहे आणि त्यावर पाकिस्तानी सैन्य अधिकार दाखवत आहे; कारण तिथे सैन्य सर्वस्वी आहे. त्यामुळे पाकिस्तानला वाटते आता पाकिस्तानची शक्ती वाढली आहे आणि भारतातही सरकार कमजोर आहे, अशा वेळी काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढवून काश्मीरचा मुद्दा पुन्हा जागतिक पातळीवर आणण्याचा पाकिस्तानचा उद्देश आहे.

(हेही वाचा – #independenceday : स्वातंत्र्यदिनी ‘वंदे मातरम’ गायला ‘ना हरकत’ कोणी दिली?)

तिसऱ्या सर्जिकल स्ट्राइक ची गरज

अशावेळी भारताने एक देश म्हणून काय करायला पाहिजे. सैन्याने या भागात गस्त वाढवली आहे. दहशतवादविरोधी मोहिमा वाढवल्या आहेत. नॉर्दन कमांडसोबत आता वेस्टर्न कमांडही एकत्र दहशतवादविरोधी मोहिमा करू लागल्या आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांचा येत्या काळात निष्पात केला जाईल, यात काही शंका नाही. यासाठी मात्र भारतीय सैन्याला आपले रक्त सांडून किंमत मोजावी लागेल. कारण याआधीही दहशतवादी कारवायांमध्ये सैन्याच्या मोठ्या अधिकाऱ्यांना वीरगती प्राप्त झाली आहे. सैन्याच्या पातळीवर येथील दहशतवाद संपवला जाईलच, परंतु देश म्हणून आपण काय करायला हवे, आपण सर्जिकल स्ट्राइक ३ करायला पाहिजे का? तर याचे उत्तर ‘हो’ असे आहे. पाकिस्तानवर प्रतिहल्ला करण्यासाठी आपण काय केले पाहिजे यावर विचार करायला हवा. मला खात्री आहे, सरकार यादृष्टीने विचार करत असेल आणि पाकिस्तानच्या विरोधात एक आक्रमक कारवाई केली जाईल. कारण सैन्याचे जे दहशतवादविरोधी अभियान सुरु आहे, ही संरक्षणात्मकदृष्ट्या कृती आहे. म्हणजे घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांना ठार करत आहेत आणि नवीन दहशतवादी निर्माण होत असतील तर त्यांना ठार करत आहेत. दहशतवादाचे मूळ हे पाकिस्तानात आहे, त्यामुळे अजून एक सर्जिकल स्ट्राइक करण्याची आवश्यकता आहे. (Independence Day)

बांगलादेशातील हिंदूंसाठी ‘सीएए’ गरजेचा

बंगालदेशातील विद्यार्थ्यांचे जे आरक्षणाचे आंदोलन सुरु आहे, ते फक्त नावापुरते होते. त्याला चीन, पाकिस्तान आणि अमेरिकेतील काही संस्थांचा पाठिंबा आहे. यात अमेरिकेला आशियामध्ये असे सरकार हवे होते जे त्यांच्या ताटाखालचे मांजर असेल, पण शेख हसीना अमेरिकेचे ऐकायला तयार नव्हत्या. म्हणून या आंदोलनाचा बांगलादेशात सत्तापालट हाच उद्देश होता. यात जमात ए इस्लाम, बीएनपी या पक्ष आणि संघटना पाकिस्तनधार्जिण्या आहेत. त्या सक्रिय झाल्या आहेत. आता बांगलादेशात शांतात निर्माण करण्यासाठी कुणीही प्रयत्न करत नाही. बांगलादेशात सैन्यही हिंसाचार थांबवण्यासाठी प्रयत्न करत नाही. त्यामुळे तिथे अराजकता माजली आहे. या प्रकारामध्ये बांगलादेशी सैन्यही सामील आहे का, अशी शंका येऊ लागली आहे. या ठिकाणाहून हजारो बांगलादेशी निर्वासित भारताकडे येऊ लागले आहेत. ४ हजार किमी बांगलादेशाची सीमा भारताशी लागून आहे. जे हिंसेचे शिकार बनत आहेत, त्यांना पलायन करण्याची वेळ आली आहे. त्यामध्ये जे अवामी लीगचे समर्थक आहेत ते आणि हिंदू जनता यांचा समावेश आहे, ज्यांच्यावर हल्ले होऊ लागले आहेत. जेव्हा बांगलादेश निर्माण झाला तेव्हा हिंदू २३ टक्के होते आज तिथे ८ टक्के हिंदू राहिले आहेत. हिंदूंची संख्या रोडावली आहे, कारण तेथील हिंदूंकडे असलेल्या जमिनी त्यांना बळकावायच्या आहेत. तिथे हिंदूंची घरे लुटली जात आहेत, तेथील हिंदू महिलांवर अत्याचार होत आहेत. ते हिंदू भारतात आश्रय घेण्यासाठी येत आहेत. १९७१च्या युद्धात १ कोटी पेक्षा अधिक बांगलादेशी भारतात निर्वासित झाले होते. तशीच परिस्थिती पुन्हा होऊ शकते. आता बांगलादेशात हिंदूंचे रक्षण भारत करू शकतो का, या प्रश्नाचे उत्तर शोधताना भारताने यासाठी बांगलादेशात सैन्य पाठवावे, हा पर्याय होऊ शकत नाही. मात्र भारत बांगलादेशी सैन्यावर दबाव टाकत आहे, तेथील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी सांगत आहेत, पण ते सैन्य हिंदूंचे रक्षण करत नाहीत हे वास्तव आहे. येणाऱ्या काळात भारतावर त्याचा गंभीर परिमाण होणार आहे त्यासाठी सीएए सारखा कायदा अंमलात आणायला हवा. आजूबाजूच्या देशात हिंसाचाराखाली असलेल्या हिंदूंना भारतात प्रवेश देण्याची तरतूद आहे, त्यावर विचार करावा लागेल. (Independence Day)

(लेखक सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरचे प्रमुख आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.