अवयव प्रत्यारोपण व प्रशिक्षणासाठी केईएममध्ये स्वतंत्र शस्त्रक्रिया गृह

134

मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण विषयक प्रशिक्षण देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने नवीन शस्त्रक्रिया गृह तथा प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. याचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या हस्ते करण्यात आले. आजपासून सुरू होत असलेल्या अवयव प्रत्यारोपण विषयक प्रशिक्षण केंद्रामध्ये दरवर्षी सुमारे ६०० डॉक्टरांना अवयव प्रत्यारोपणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे अवयव प्रत्यारोपण अधिक प्रभावी व परिणामकारक होण्यास मदत होईल. परिणामी अनेकांना नवजीवन मिळणार आहे.

प्रशिक्षण केंद्रामुळे अवयवदान चळवळीस मिळणार बळ

या उदघाटन प्रसंगी बोलतांना काकाणी यांनी, अनेकांना नवजीवन देणाऱ्या अवयव दानसाठी अधिकाधिक नागरिकांनी पुढे यावे याकरिता विविध स्तरावर जनजागृती करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने कौटुंबिक स्तरावर संवाद साधणे, अवयवदानाची पद्धत अधिक सुलभ करणे आणि रुग्णालयांमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अवयव दानासंबंधी माहिती योग्य प्रकारे मिळावी, यादृष्टीने संबंधित अर्जामध्ये आवश्यक ते बदल करणे, असे विविध स्तरीय प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले‌. या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालनालयाचे डॉक्टर अनिल कुमार यांनी केईएम रुग्णालयाचे आणि पर्यायाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध स्तरीय कामांचे कौतुक केले. तसेच आजपासून सुरू होत असलेल्या प्रशिक्षण केंद्रामुळे अवयवदान चळवळीस बळ मिळेल असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.‌

दरवर्षी ६०० डॉक्टरांना अवयव प्रत्यारोपणाचे प्रशिक्षण

आजपासून सुरू होत असलेल्या अवयव प्रत्यारोपण विषयक प्रशिक्षण केंद्रामध्ये दरवर्षी सुमारे ६०० डॉक्टरांना अवयव प्रत्यारोपणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे अवयव प्रत्यारोपण अधिक प्रभावी व परिणामकारक होण्यास मदत होईल. परिणामी अनेकांना नवजीवन मिळेल, असा विश्वास याप्रसंगी अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुजाता पटवर्धन यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉक्टर आकाश शुक्ला यांनी केले.

(हेही वाचा – भारताने घेतली ‘हेलिना’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी)

या कार्यक्रम प्रसंगी पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील, नवी दिल्ली येथील आरोग्य सेवा महासंचालनालयाचे अतिरिक्त उपमहासंचालक डॉक्टर अनिल कुमार, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत, डॉक्टर गुस्ताद दावर, अवयव प्रत्यारोपण विषयक रोट्टो-सोट्टो संस्थेच्या संचालिका डॉक्टर सुजाता पटवर्धन, सहसंचालक डॉ. आकाश शुक्ल, केईएमचे डॉक्टर प्रवीण बांगर व रुग्णालयातील विविध विभागांचे विभाग प्रमुख, अवयव प्रत्यारोपण क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी आणि वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते.

अवयव दानासाठी या क्रमांकावर करा संपर्क

मुंबईतील ज्या डॉक्टरांना अवयव प्रत्यारोपण विषयक प्रशिक्षणासाठी नोंदणी करावयाची असेल त्यांनी [email protected] या ईमेल पत्त्यावर किंवा ७०२१-९३२-४४७ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच ज्यांना अवयव दान नोंदणी करावयाची असेल त्यांनी देखील याच क्रमांकावर संपर्क साधावा, असेही संबंधितांद्वारे कळविण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.