भारताची जागतिक पातळीवर घौडदौड जोरात सुरु आहे. नुकतेच भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले आहे. मात्र आता भारत आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणार आहे, कारण भारत जगातील तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे, तसा अहवाल भारतीय स्टेट बँकेचा आहे. या शतकाच्या शेवटी भारतीय अर्थव्यवस्थेचा विस्तार आणखी व्यापक होईल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
‘या’ देशांना टाकणार मागे
भारतीय स्टेट बँकेच्या रिसर्च डिपार्टमेंटच्या नव्या अहवालानुसार, भारत येत्या काळात अनेक महासत्तांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २०२७ पर्यंत भारत जर्मनीच्या पुढे जाईल आणि २०२९ पर्यंत जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकेल. सध्या जागतिक क्रमवारीत जर्मनी चौथ्या आणि आणि जपान तिसऱ्या स्थानावर आहे. अशा प्रकारे या दशकाच्या शेवटी भारतीय अर्थव्यवस्था अधिक विस्तार करत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा अवघ्या १०-१५ दिवसांत खेतवाडीतील १५-२० फुटांच्या गणेशमूर्ती कशा उभ्या केल्या?)
सध्या भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर
ब्रिटनला मागे टाकत भारत पाचव्या क्रमांकावरील जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. एका दशकाआधी या क्रमवारीत भारताचा क्रमांक अकरावा होता. मात्र आता भारत या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे कधी काळी ब्रिटिशांचे राज्य असणारा भारत आता ब्रिटनला मागे टाकत अग्रेसर ठरला आहे. सध्या पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि दुस-या क्रमांकावर चीन आहे.
Join Our WhatsApp Community