दुबईत भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव: मुंबईच्या स्वप्नीलचा बहुमान!

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दुबईत आयोजित कला प्रदर्शनात मूळचे मुंबईचे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे पदवीधर स्वप्नील जावळे यांची चित्रे मांडण्यात आली. 

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दुबईतील भारतीय दूतावासाने ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाअंतर्गत ‘भारतीय कला आणि हस्तकला’ प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यामध्ये तब्बल साडेसहाशे कलाकारांमधून मूळचे मुंबईचे असलेले स्वप्नील जावळे यांची निवड झाली. त्यांना त्यांची चित्रे या प्रदर्शनात ठेवण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. स्वप्नील यांनी या प्रदर्शनासाठी काही खास चित्रे काढली.

दुबईतील भारताचे राजदूत डॉ. अमन पुरी, प्रमुख पाहुणे खलील अब्दूल वाहिद (डायरेक्टर – फाईन आर्ट, दुबई कल्चर आणि आर्टस ॲथॉरिटी) यांनी भारताच्या पंचाहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाबद्दल आयोजित केलेल्या ‘कला आणि हस्तकला’ प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या सोहळ्यासाठी जमलेल्या कलाकारांच्या, भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांच्या आणि काही खास निमंत्रित पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. हे प्रदर्शन १९ जुलै ते ८ सप्टेंबर या काळात सोमवार ते बुधवार या दिवशी दुपारी २:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत सर्वसामान्यांसाठी खुले राहील. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

स्वप्नील जावळे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे पदवीधर!

स्वप्नील जावळे यांचे शिक्षण मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌समध्ये झाले आहे. त्यांनी ‘अप्लाईड आर्ट्‌स ॲन्ड प्रिंटिंग टेक्नॉलॉजी’ या विषयात पदवी प्राप्त केली आहे. प्रिंट ॲनॅलिस्ट, क्युरेटर आणि आर्टिस्ट असलेले स्वप्नील २००९ सालापासून दुबईमध्ये वास्तव्यास आहे. मातीशी नाळ जोडलेली असणे आणि आयुष्यात समतोल असणे यांचे महत्त्व आपली ही खास ‘द वॉक’ ही चित्रमालिका सांगते. माझ्या अंतर्यामीचा सूर आणि ताल माझे अस्तित्व शोधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. ही लय आपल्याला आयुष्यभर निसर्गातल्या ऊर्जेशी आणि त्या माध्यमातून प्राचीन परंपरागत ज्ञानाशी जोडत राहते, असे मनोगत यानिमित्त्ताने स्वप्नील जावळे यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here