तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणा-या आजारावर होतो इतका खर्च

ही अतिशय गंभीर समस्या असून त्यावर वेळीच नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे.

धूम्रपान हानिकारक आहे… smoking is injurious to health. सिनेमागृहांत ही जाहिरात झळकते. त्यावेळी आपल्याला त्या जाहिराताची किळस येते. अगदी आपण त्याचे सेवन करत असू तरीसुद्धा. आता सिगारेट, तंबाखू यांसारख्या पदार्थांचा वापर कमी व्हावा, यासाठी सरकारकडून या पदार्थांवर भरमसाठ कर आकारले जातात. पण तरीसुद्धा या पदार्थांचे व्यसन असलेल्यांवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. पण ही अतिशय गंभीर बाब असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

धूम्रपान आणि तंबाखूचे सेवनाने आजार होणा-यांवर उपचार करण्यासाठी होणारा खर्च हा भारताच्या एकूण जीडीपीच्या 1 टक्के एवढा आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आली आहे.

आरोग्य सेवांच्या खर्चात होते वाढ

तंबाखूशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठीचा खर्च हा भारतातील वर्षभराच्या खाजगी आणि सार्वजनिक आरोग्य खर्चाच्या 5.3 टक्के इतका आहे. भारताचे डब्ल्यूएचओ प्रतिनिधी डॉ. रोडेरिको एच. ऑफ्रिन यांच्या म्हणण्यानुसार, 2011-18 दरम्यान भारतातील तंबाखूच्या वापराशी संबंधित आरोग्य सेवांच्या खर्चामध्ये 21% वाढ झाली आहे. तसेच 35 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या तरुणांच्या मृत्यूतही तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांचे प्रमाण कमी करणे, हे भारत सरकार समोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.

कॅन्सरचा वाढतो धोका

आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये भारतात तंबाखूच्या सेवनाने होणा-या कर्करोगाचे प्रमाण 27 टक्के इतके आहे. भारतात तंबाखूच्या सेवनाचे प्रमाण 29 टक्के इतके आहे. तंबाखूच्या सेवनामध्ये भारत हा चीननंतर जगातील दुसरा देश आहे. तंबाखूजन्य पदार्थांवर मिळणा-या 100 रुपये करामागे भारताच्या अर्थव्यवस्थेचे 816 रुपये त्यामुळे होणा-या आजारांवर खर्च होतात, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात दिली आहे. त्यामुळे ही अतिशय गंभीर समस्या असून त्यावर वेळीच नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here