Turkey Earthquake: तुर्कीच्या संकटात भारताकडून मदतीचा हात; लवकरच NDRF पथकासह मदत सामग्री पाठवली जाणार

168

तुर्कीतल्या सीरियाच्या सीमेजवळील भागात सोमवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास ७.८ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप झाला. आतापर्यंत या शक्तिशाली भूकंपात ५००हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून ३०००हून अधिक नागरिक जखमी झाले आहे. या भूकंपातील मृत्यूचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. सध्या भूकंपात अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचे काम सुरू आहे. तसेच भूकंपाची तीव्रता पाहता राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी आणीबाणी घोषित केली आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. लवकरच मदत सामग्री पाठवली जाणार असून यासंदर्भातील बैठक नुकतीच पंतप्रधान कार्यालयात पार पडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आपत्तीमध्ये भारताकडून सर्वतोपरी मदतीची घोषणा केली आणि त्यानंतर पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी.के. मिश्रा यांनी साऊथ ब्लॉकमध्ये तातडीने तुर्कीला मदत करण्याबाबत महत्त्वापूर्ण बैठक बोलावली. या बैठकीत एनडीआरएफच्या तुकड्या, बचाव पथ, औषधे आणि मदतीच्या साहित्याची खेप त्वरित पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

(हेही वाचा – 7.9 रिश्टर स्केलच्या भुकंपानं हादरलं तुर्की; 34 इमारती पडल्या, मोठी जीवितहानी झाल्याची भीती)

त्यानुसार भारताकडून पाठवल्या जाणाऱ्या टीममध्ये विशेष प्रशिक्षित श्वान पथके आणि आवश्यक उपकरणांसह १०० कर्मचाऱ्यांच्या दोन एनडीआर पथके भूकंपग्रस्त भागात शोध आणि बचाव कार्यास जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. आवश्यक औषधे, प्रशिक्षित डॉक्टर आणि पॅरामेडिक्ससह वैद्यकीय पथकेही तयार केली जात आहेत.

दरम्यान यापूर्वी अमेरिकेने तुर्कीला मदतीची घोषणा केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, ‘तुर्कीत अतिशय विनाशकारी असा भूकंप झाला आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असून तुर्की प्रशासनाच्या संपर्कातही आहोत. तसेच कोणत्या पद्धतीने आणि वेगाने मत पोहोचवता येईल यांचे नियोजन करत आहोत.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.