भारतावरही आली असती श्रीलंकेसारखी बिकट परिस्थिती, पण…

107

सध्या भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेवर ओढावलेल्या आर्थिक संकटाची संपूर्ण जगात चर्चा आहे. चीनकडून घेतलेल्या बेसुमार कर्जाच्या बोज्याखाली श्रीलंकन अर्थव्यवस्था गाढली घेली आहे. चिनी ड्रॅगनने श्रीलंकन लायन गिळून टाकला आहे. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था सावरुन तिला नवसंजीवनी देण्याचं मोठं आव्हान सध्या श्रीलंकेसमोर आहे.

श्रीलंकेसारखीच परिस्थिती भारतावरही ओढावू शकते, अशा चर्चा सध्या कानावर पडत आहेत. पण भविष्यात भारतावर असं संकट येईल की नाही हे सांगता येणार नाही. पण भूतकाळात मात्र भारतावर श्रीलंकेसारखी वेळ आली असती, असं अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. 1990-91 मध्ये भारतावरही फार मोठे आर्थिक संकट आले होते.

का आलं होतं आर्थिक संकट?

देशातील राजकीय अस्थिरता, इंदिरा गांधींच्या काळात भारताने स्विकारलेले समाजवादी नियोजनाचे तत्व, अर्थव्यवस्थेवर सरकारचे असलेले अवाजवी नियंत्रण या कारणांमुळे 190-91 मध्ये भारताची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

(हेही वाचाः …तरच श्रीलंका वाचेल; आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक काय सांगताहेत?)

परकीय गंगाजळी आटली

कुठल्याही देशाकडे असणारा परकीय चलनसाठा हा त्या देशाची जागतिक अर्थव्यवस्थेतील पत ठरवत असतो. जितकं परकीय चलन जास्त तितका तो देश आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली मानला जातो. पण 1990-91 मध्ये भारतातील परकीय चलनाच्या तिजोरीला मोठे भगदाड पडले होते. जानेवारी 1991 मध्ये भारताकडे केवळ 1.2 बिलियन डॉलर परकीय चलन होते. जून 1991 मध्ये हेच परकीय चलन 0.8 बिलियन डॉलरपर्यंत घसरले.

जेव्हा आपण देशात वस्तू परदेशातून आयात करतो तेव्हा आपल्याला परकीय चलनात त्या वस्तूंची किंमत मोजावी लागते. पण भारतात आलेल्या आर्थिक संकटामुळे केवळ 3 आठवडेच पेट्रोलियम आयात करता येईल इतकाच परकीय चलनसाठा भारतात उरला होता.

भारतासमोर मोठा पेच

त्यामुळे या परिस्थितीतून सावरण्यासाठी भारताला केवळ परकीय कर्जच वाचवू शकणार होते. त्यामुळे आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेली अर्थव्यवस्था आणखी खिळखिळी होणार होती. पण मुख्य म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आल्यामुळे कर्ज देण्यासही कोणता देश धजावत नव्हता. आपल्या सदस्य देशांना कर्ज देणा-या IMF कडून देखील भारताने आवश्यक तेवढे कर्ज घेऊन झाले होते. त्यामुळे भारतासमोर मोठा पेच निर्माण झाला होता.

(हेही वाचाः राजकीय अस्थिरता आणि अर्थव्यवस्थेला असलेला चिनी विळखा! श्रीलंकेच्या दुरावस्थेची कारणे)

…आणि टळलं संकट

जेव्हा एखादं कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करत असतं तेव्हा जसं सोनं गहाण ठेऊन कर्ज घेतलं जातं, तसंच 1991 साली भारतानेही केलं. भारताने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानमध्ये 47 टन, तर बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये 20 टन सोने गहाण ठेवले आणि त्या बदल्यात कर्ज घेतले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.