अरूणाचल प्रदेशातील तवांग येथे भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळ्याचे समोर आले आहे. या अपघातात एक पायलट शहीद झाला असून दुसरा पायलट गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. या अपघातानंतर भारतीय लष्करातील अधिकारी आणि सैनिक घटनास्थळी रवाना झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते, त्यापैकी एक पायलट लेफ्टनंट कर्नल सैरभ यादव हे शहीद झाले आहेत. तर त्याचवेळी दुसऱ्या पायलटला गंभीर अवस्थेत लष्करी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Dasara Melava 2022: दसरा मेळाव्यात सीमोल्लंघन! २ खासदारांसह ५ आमदारांचा शिंदे गटात होणार प्रवेश)
सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तवांग जिल्ह्यातील जेमीथांग सर्कलच्या बाप टेंग कांग धबधब्याजवळील न्यामजांग चू या ठिकाणी अपघात झाला. चित्ता हेलिकॉप्टर सुरवा सांबा भागातून टेहळणीसाठी या भागात येत होते.
चित्ता हेलिकॉप्टर भारतीय लष्कराच्या ताफ्यात १९७६ मध्ये दाखल झाले होते. हे चित्ता हेलिकॉप्टर प्रवास, निरीक्षण, पाळत ठेवणे, लॉजिस्टिक मदत आणि बचाव कार्यासाठी होतो. उंचीवरील मोहिमेसाठी हे चित्ता हेलिकॉप्टर उपयोगी आहे. भारताबाहेर परदेशातही या हेलिकॉप्टरचा वापर होतो. या विमानात दोन पायलट आणि तीन प्रवासी बसू शकतात. दरम्यान, गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये देशातील पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचाही हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे पद ९ महिन्यांहून अधिक काळ रिक्त राहिले होते.
Join Our WhatsApp Community