एलॉन मस्क यांनी ट्विटरचा पदभार स्वीकारल्यानंतर या सोशल मीडिया कंपनीच्या शीर्ष व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, टेस्लाचे मालक आणि अब्जाधीश असणारे एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर दिवसेंदिवस ट्विटरसंबंधित नवनवीन निर्णय समोर येत आहे. जसे की, ब्ल्यू टिकसाठी युजर्सकडून पैसे आकारणं, ट्विट केल्यानंतर ते एडिट करण्याचा पर्याय अशा अनेक फीचर्सवर काम सुरु आहे. मात्र ट्विटरवर अचानक झालेल्या या बदलांमागे आणि झालेल्या उलथा-पालथ मागे कोणती व्यक्ती आहे, तुम्हाला माहितीये का…?
(हेही वाचा – एलॉन मस्कचा ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना थेट मेल, ‘ऑफिसला येणार असाल तर…’)
ट्विटरला कमाईचा अड्डा बनविण्याचा सल्ला देण्यामागे आणि सर्व मोठ्या निर्णयांमागे भारतीय वंशाचे श्रीराम कृष्णन असल्याचे सांगितले जात आहे. ३० ऑक्टोबरपासून श्रीराम कृष्णन हे ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को येथील मुख्यालयात आपले ठाण मांडून होते. यादरम्यान, मस्क हे न्यूयॉर्कला गेले असताना ट्विटरबाबत सर्व मोठे, प्रमुख निर्णय त्यांच्या देखरेखी खाली घेतले जात होते. दरम्यान, ३१ ऑक्टोबररोजी श्रीराम कृष्णन यांनी एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी असे म्हटले की, . मी ट्विटरसाठी काही उत्तम लोकांच्या टीमसोबत एलॉन मस्क यांना मदत करत आहे. मला विश्वास आहे की ही एक अतिशय महत्त्वाची कंपनी आहे. याचा जगावर मोठा प्रभाव पडू शकतो आणि एलॉन हे अशे व्यक्ती आहेत जे ते शक्य करतील.
Now that the word is out: I’m helping out @elonmusk with Twitter temporarily with some other great people.
I ( and a16z) believe this is a hugely important company and can have great impact on the world and Elon is the person to make it happen. pic.twitter.com/weGwEp8oga
— Sriram Krishnan – sriramk.eth (@sriramk) October 30, 2022
हे श्रीराम कृष्णन कोण आहेत, त्याचा एलॉन मस्क यांच्याशी काय संबंध आहे? तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया…
श्रीराम कृष्णन हे मूळचे चेन्नईचे असून ते व्यवसायाने इंजिनिअर आहेत. श्रीराम कृष्णन यांनी मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि स्नॅपचॅटमध्येही काम केले आहे. ते सध्या एन्ड्रिसेन होरिवित्झ नावाच्या व्हेंचर कॅपिटल फर्ममध्ये भागीदार आहेत. मायक्रोसॉफ्टमध्ये व्हिज्युअल स्टुडिओसाठी प्रोग्राम मॅनेजर म्हणून त्यांनी 2007 मध्ये पहिल्या नोकरीला सुरूवात केली होती. तर 2013 मध्ये त्यांनी फेसबुक जॉईन केले. त्यांनी 2016 पर्यंत फेसबुकमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. त्यांनी स्नॅपचॅटसोबत देखील काम केले.
या बदलांमागे कृष्णन यांनी दिला मस्क यांना सल्ला
सध्या ट्विटरवर अचानक होत असलेल्या बदलांमध्ये श्रीराम कृष्णन यांची मोठी भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. या बदलांमध्ये पहिला बदल हा ब्ल्यू टिकसाठी दरमहा 8 डॉलर्स द्यावे लागतील, असा होता. ज्यामध्ये ब्ल्यू सबस्क्रिप्शनसाठी, युजर्सना दरमहा 8 डॉलर्स म्हणजेच सुमारे 660 रुपये द्यावे लागणार आहे. दुसरा बदल म्हणजे पोस्टसाठी वर्ण मर्यादा म्हणजेच कॅरेक्टर लिमिट 280 वरून वाढवली जाणार आहे. सध्या ट्विटरवर ट्विट करण्यासाठी, युजर्स केवळ 280 अक्षरांमध्येच मेसेज लिहू शकत होते. तर तिसरा बदल हा लॉगआउट केल्यानंतरही तुम्ही ट्रेडिंग ट्विट आणि स्टोरी पाहू शकणार आहात.