तुर्की-सीरियामध्ये भूकंपामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका भारतीय व्यावसायिकाचा सुद्धा दुर्दैवी अंत झाला आहे. या भारतीय व्यावसायिकाचे नाव विजय कुमार गौड असून भूकंप झाल्यावर विजय यांच्यासोबत संपर्क होत नव्हता. त्यामुळे भारतामध्ये विजय यांची पत्नी आणि सहा वर्षांचा लहान मुलगा चिंतेत होता.
( हेही वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पर्यटक सर्किट ट्रेनचे 14 एप्रिलला उद्घाटन!)
तुर्कीमधील भारतीय दुतावासाने दिली माहिती
तुर्की-सीरियामधील भूकंपात २९ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय व्यावसायिक विजय कुमार गौड यांचे वय ३६ वर्ष होते. विजय ज्या हॉटेलमध्ये राहत होते ते हॉटेल ६ फेब्रुवारीला भूकंपामुळे कोसळले. त्यानंतर विजय यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही आणि अखेर ढिगाऱ्यातून त्यांच्या मृतदेह सापडला. तुर्कीतील भारतीय दुतावासाने ही माहिती दिली आहे.
२० फेब्रुवारीला भारतात परतणार होते…
ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे विजय यांचा चेहरा विद्रुप झाला होता त्यामुळे त्यांची ओळख पटवणं कठिण होते अखेर त्यांच्या हातावर असलेल्या ओम अक्षराच्या टॅटूवरून त्यांची ओळख पटली. विजय कुमार गौड हे कामानिमित्त तुर्कीला गेले होते. एवढे दिवस त्यांचा फोन वाजत होता परंतु कोणीही उत्तर देत नव्हते, विजय २० फेब्रुवारीला भारतात परतणार होते अशी माहिती विजय यांचे भाऊ अरुण कुमार गौड यांनी दिली आहे. भूकंपानंतर तुर्कीमध्ये एक भारतीय बेपत्ता असून १० अडकले आहेत. तसेच ९ भारतीय दुर्गम भागात सुरक्षित असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community