आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारधारांनी प्रेरित होणार तरुण! विद्यापीठांमध्ये सुरू होणार अध्ययन केंद्र

देशभरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवन परिचय विविध सेमिनार, व्याख्याने आणि विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून करुन देण्यात येणार आहे.

85

देशभरातील विद्यापीठांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर अध्ययन केंद्र सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्नशील असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले होते. स्मारकाच्या याच प्रयत्नांना आता यश आले आहे. भारतीय इतिहास संशोधन परिषदेने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) प्राध्यापक उमेश कदम यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याद्वारे देशभरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवन परिचय विविध सेमिनार, व्याख्याने आणि विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून करुन देण्यात येणार आहे.

अध्ययन केंद्राची मागणी

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या क्रांतिकारकांची महान गाथा सांगणा-या ‘हे मृत्युंजय’ नाटकाचा जेएनयू येथे यशस्वी प्रयोग करण्यात आला. या प्रयोगामुळे तेथील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या पराकोटीच्या राष्ट्रभक्तीची नव्याने ओळख झाली. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातही या नाटकामुळे, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मातृभूच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग पाहून तेथील विद्यार्थी प्रेरित झाले. त्यामुळे तरुणांपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार पोहोचावेत, म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना पत्र लिहिले. या पत्रात देशभरातील विद्यापीठांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर अध्ययन केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.

लवकरच होणार कार्यक्रमांचे आयोजन

11 सप्टेंबर 2019 रोजी भारतीय इतिहास संशोधन परिषदेने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तो कार्यक्रम देशभरातील विद्यापीठांमध्ये सादर करण्याचा निर्णय परिषदेने घेतला होता. जेएनयूमधील इतिहास अध्ययन केंद्राचे प्राध्यापक असलेल्या उमेश कदम यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरी, अंदमान आणि राजस्थान येथे लवकरच या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राष्ट्रप्रेम, त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचे संशोधन केले जावे, हा यामागील हेतू आहे. त्यासाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाप्रमाणे देशभरातील शिक्षण संस्थांमध्ये अध्ययन केंद्र स्थापन करण्याची गरज आहे. यासाठी मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मदतीने आम्ही सरकारकडे वारंवार याबाबत मागणी करत होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्याप्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अध्ययनासाठी अध्ययन केंद्र स्थापन व्हावे, अशी आमची इच्छा आहे. आता भारतीय इतिहास संशोधन परिषदेद्वारे सेमिनार आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानुसार पहिला सेमिनार रत्नागिरी येथे आयोजित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्त्वावरील विचारांचा जो अपप्रचार करण्यात येत आहे, तो थांबवून त्यामागे असलेला सावरकरांचा व्यापक दृष्टीकोन तरुणांसमोर आणण्याचा आमचा मानस आहे.

-प्रा. उमेश कदम, संयोजक
भारतीय इतिहास संशोधन परिषद (स्वातंत्र्यवीर सावरकर सेमिनार शृंखला)

जेएनयूत भारतमाता आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयजयकार

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे 23 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना एक पत्र देण्यात आले होते. यामध्ये विद्यापीठांत स्वातंत्र्यवीर सावरकर अध्ययन केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. याआधीही ‘हे मृत्युंजय’ नाटकाच्या प्रयोगासाठी स्मारकाकडून पत्र देऊन मागणी करण्यात आली होती. त्याला मान्यता देण्यात आली. त्यानंतर डाव्या विचारसरणीच्या लोकांना आंदण दिलेले माहेरघर असणा-या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात या नाटकाचा यशस्वी प्रयोग संपन्न झाला. त्यावेळी भारत तुम्हारे तुकडे होंगे, अशा घोषणांनी दूषित झालेला जेएनयूचा परिसर भारत माता की जय, वंदे मातरम्, स्वातंत्र्यवीर सावरकर की जय, अशा जयजयकारांनी दुमदुमून गेला होता.

12 ऑगस्ट 2019 रोजी दिल्ली विद्यापीठ आणि 13 ऑगस्ट 2019 रोजी जेएनयू येथे या नाटकाचे प्रयोग करण्यात आले. या नाटकामुळे प्रेरित झालेल्या तरुणांनी शक्ती सिंह या विद्यार्थ्याच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह या त्रिमूर्तींच्या पुतळ्यांची स्थापना केली.

सावरकरांची जयंती आणि आत्मार्पण दिन जेएनयूत होतो साजरा

विद्यार्थ्यांच्या जोरदार मागणीनंतर पुन्हा एकदा जेएनयू येथे ‘हे मृत्युंजय’ नाटकाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार तेथील तरुणांमध्ये अधिक दृढ झाले. यानंतर तेथील वातावरण बदलले. जेएनयूच्या कँपसमधील एका मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रयत्नांनी हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनी 26 फेब्रुवारी 2020 रोजी संपन्न झाला. आता दरवर्षी तिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती(28 मे) आणि आत्मार्पण दिन (26 फेब्रुवारी) मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.