बऱ्याचदा आपल्याकडे असणाऱ्या नोटांवर काहीतरी लिहिलेले असते, त्यावर कसलेतरी डाग पडलेले असतात किंवा त्या नोटा फाटलेल्या अवस्थेत असतात. या नोटा एखादा व्यवहार करताना दुकानदार स्वीकारत नाही. मात्र खरंच दुकानदार त्या नाकारू शकतो का? अशा नोटा व्यवहार चालतात का की नाही? इतकेच नाही तर एखाद्याकडून नोट घेताना ती नोट खरी आहे की नाही हेही आपण तपासतो. परंतु, व्यवहारात असलेल्या जुन्या, फाटलेल्या, डाग लागलेल्या या नोटांबद्दल रिझर्व्ह बँकेचा (RBI) नियम काय सांगतो तुम्हाला माहिती आहे का?
(हेही वाचा – Indian Currency: भारतीय नोटेवर कोणाचं चित्र किंवा फोटो छापले जाणार, हे कोण ठरवतं?)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर देशात चलन जारी करण्याची जबाबदारी आहे. कायद्याच्या कलम २२ नुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला भारतात नोटा जारी करण्याचा अधिकार आहे. तर कलम २५ नुसार, नोटांची रचना, फॉर्म आणि सामग्री भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या शिफारशींचा विचार केंद्र सरकारच्या मान्यतेच्या अधीन असते.
काय सांगतो RBI चा नियम?
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मते, महात्मा गांधींच्या प्रतिमा असलेल्या सर्व नोटा, ज्यावर काहीतरी लिहिले असेल, रंग लागला असेल, त्या वैधरित्या चलनात वापरता येतील. पण त्या नोटेवर असलेले अंक वाचता येणे गरजेचे आहे. अशा नोटा कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत जमा केल्या जाऊ शकतात आणि बदलूनही मिळतात. पण नोटेवर राजकीय किंवा धार्मिक स्वरूपाचा संदेश देण्याच्या उद्देशाने लिहिलेले अनावश्यक शब्द किंवा चित्रे दिसली, तर त्या बदलता येत नाहीत.
तुमच्याकडे अशा प्रकारच्या नोटा असतील तर त्या तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन फाटलेल्या नोटा बदलून घेऊ शकतात. दरम्यान, फाटलेल्या नोटांबाबत रिझर्व्ह बँक वेळोवेळी परिपत्रक जारी करत असते. तर एखादी व्यक्ती ऐकावेळी जास्तीत जास्त २० नोटाच बदलू शकतो. या नोटांचे एकूण मूल्य पाच हजार रुपयांपेक्षा जास्त नसले पाहिजे तसेच पूर्णपणे जळालेल्या किंवा फाटलेल्या नोटा बदलून दिल्या जात नाहीत. विशेष म्हणजे अशा नोटा बदलण्यासाठी बँकेत कोणतेही शुल्क आकारले जात नाही तर त्या तुम्ही सहज बदलून घेऊ शकतात.
Join Our WhatsApp Community