येत्या चार ते पाच वर्षांत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. तसेच ज्या प्रकारे भारताची प्रगती होत आहे, ती बघता आपली अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 35-40 ट्रिलियन डॉलर्सच्या जवळपास पोहोचेल आणि प्रत्येक भारतीयांची हीच इच्छा आहे, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. ते पुण्यात सुरू असलेल्या आशियाई आर्थिक संवादात बोलत होते.
( हेही वाचा : बालाकोट एअर स्ट्राईकला ४ वर्ष पूर्ण! भारताने असे उद्धवस्त केले होते पाकिस्तानातील दहशतवादी तळ)
आज लोकांमध्ये, भारतीय उत्पादनांविषयी अभिमान बाळगण्यासाठी जाणीवजागृती करणे काळाची गरज आहे, असे गोयल म्हणाले. “भारताचा कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे. लोकांचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्यावर विश्वास आहे. मात्र आशियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तत्वज्ञान असलेल्या अर्थव्यसस्था आहेत. आपल्या देशातील लोकांना, निम्न दर्जाच्या, स्वस्त चीनी मालाच्या आकर्षणापासून परावृत्त करण्यासाठी, आपल्याला आणखी थोडा वेळ लागेल, त्यासाठी आपल्याला पुरेशा व्यवस्था आणि उत्पादन व्यवस्था तयार कराव्या लागतील आणि लोकांमध्ये जाणीवजागृतीही करावी लागेल”, असे त्यांनी सांगितले.
गोयल म्हणाले की, भारत हा आता जगाने विश्वास ठेवावा, असा एक भागीदार आहे. मुक्त व्यापार कराराबद्दल बोलताना उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना त्यांनी सांगितले की, भारत आणि युएई दरम्यान 88 दिवसांमध्ये करार करून आपण जगातील आतापर्यंतचा सर्वात जलद मुक्त व्यापार करार (एफटीए) केला आहे. “आम्ही ऑस्ट्रेलिया बरोबरही जलद एफटीए केला आहे. भारताबरोबर काम करण्यासाठी जग किती उत्सुक आहे, हे यामधून दिसून येत आहे. इस्रायल, कॅनडा, ईयु, युके आणि जीसीसी बरोबर आमच्या वाटाघाटी सुरू आहेत. रशिया आणि त्याच्या युरेशियन इकॉनॉमिक युनियन भागीदार देशांना देखील भारताबरोबर जलद वाटाघाटी करायच्या आहेत.”
त्यांनी उद्योग क्षेत्राला सांगितले की सरकारने लोकांच्या सक्षमीकरणासाठी, परिवर्तन घडवणाऱ्या सुधारणा हाती घेतल्या आहेत. भारतातील तरुणवर्ग भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देईल आणि 2047 पर्यंत 47 ट्रिलियन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था पोहोचेल असेही ते म्हणाले.