भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीशांशी लढा देणाऱ्यांमध्ये महिला क्रांतिकारकानांही विशेष महत्त्व आहे. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी महिलांनी स्वतःचे बलिदान दिले होते. झाशीची राणी, अहिल्या बाई आणि अनेक शक्तिशाली स्त्रियांच्या नावांचा भारतीय इतिहास साक्षीदार आहे.
त्यात अजून एक नावदेखील समाविष्ट आहे, ते म्हणजे दुर्गावती देवी. दुर्गा देवींना भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरूंसारखी फाशी देण्यात आली नसली तरी, त्या या सर्वांच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यलढा लढत राहिल्या. क्रांतिकारकांच्या प्रत्येक योजनेचा त्या एक भाग होत्या. महिला क्रांतिकारी दुर्गावती देवींची जयंती 7 ऑक्टोबर रोजी संपन्न झाली, जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.
स्वातंत्र्य संग्रामात दुर्गा देवींचे योगदान
दुर्गा देवींना भारताची ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखले जाते. लाहोरला रावीच्या काठी बाँबचा प्रयोग करीत असता स्फोट होऊन त्यांचे पती क्रांतिकारक भगवतीचरण वोहरा निधन पावले. क्रांति प्रयत्नांत त्यांचा असा व्यर्थ बळी पडला त्यामुळे दुर्गा देवी या प्रतिशोधाच्या भावनेने धुमसू लागल्या!
लाला लजपत राय यांच्या मृत्यूनंतर दुर्गा देवी इतक्या चिडल्या होत्या की, त्यांनी स्वतः स्कॉटला मारण्याची इच्छा व्यक्त केली होती.
कोण होत्या दुर्गा देवी?
दुर्गा देवींचे खरे नाव दुर्गावती देवी होते. दुर्गा देवी यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1907 रोजी उत्तर प्रदेशातील शहजादपूर गावात झाला. दुर्गावती भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती आणि ब्रिटिश सरकारला देशातून हद्दपार करण्यासाठी सक्रिय सहभागी होता. जेव्हा त्या भगतसिंग आणि त्यांच्या पक्षात सामील झाल्या, तेव्हा त्यांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची संधी देखील मिळाली. दुर्गावतींचे वयाच्या 11 व्या वर्षी लग्न झाले होते. त्यांचे पती भगवती चरण वोहरा हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य होते.
भगतसिंग आणि साथीदारांना अशी केली मदत
दुर्गा देवी क्रांतिकारकांच्या प्रमुख सहयोगी होत्या. लाला लजपत राय यांच्या मृत्यूनंतर, भगतसिंह यांनी सँडर्सला मारण्याची योजना आखली होती. तेव्हा सँडर्स आणि स्कॉटवर सूड घेण्यासाठी उत्सुक असलेल्या दुर्गा देवींनी भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना औक्षण करुन पाठवले होते. या हत्येनंतर इंग्रज भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांच्या मागे लागले. तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी दुर्गा देवींनी वेशांतर करुन (भगतसिंगांची पत्नी बनून) लाहोर येथून कलकत्यास जाण्यास मदत केली होती. एवढेच नाही तर १९२९ मध्ये भगतसिंग यांनी विधानसभेत बॉम्ब फेकल्यानंतर आत्मसमर्पण केले. तेव्हा दुर्गा देवींनी लॉर्ड हेलीला मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो वाचला. दुर्गा देवींनी भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना जामीन देण्यासाठी स्वत:चे दागिने विकले होते.
लॅमिंग्टन शुटींग मध्ये सहभाग आणि बाबाराव सावरकरांचे सहाय्य
८ ऑक्टोबर १९३० ला मध्यरात्री मुंबईला लॅमिंग्टन रस्त्यावर पोलिस नाक्याजवळ एका मोटारीतून पिस्तुलाच्या गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये सार्जंट टेलर याच्या हातातून एक गोळी आरपार निघून गेली. त्याच्या पत्नीला तीन गोळ्या लागल्या. गोळ्या लागूनही सार्जंट टेलर आणि त्याची पत्नी यांचा प्राणघात मात्र झाला नाही. या लॅमिंग्टन शुटींग केस मध्ये क्रांतिकारी पृथ्वीसिंह आझाद, सुखदेव यांच्यासह दुर्गा देवी यांचा सहभाग होता. त्यापूर्वी त्यांनी आपल्या लहान मुलगा हरिला, बाबाराव (गणेश) सावरकरांच्या खार येथील घरी ठेवले होते. पोलिसांनी पकडण्याआधी, दुर्गा देवी आणि सुखदेवराज घरातील सर्व सामान सोडून, मागच्या दाराने पसार झाले. रात्री बाबाराव (गणेश) सावरकरांच्या ठिकाणी पोहोचले. दुर्गा देवींनी घडलेल्या सर्व गोष्टी बाबारावांना सांगितल्या. हे ऐकून बाबांनी दुर्गा देवींना कपडे बदलण्यासाठी आपल्या सुनेची साडी दिली आणि खर्चासाठी 100 रुपये दिले. पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते दादरला येऊन मुंबईतून निसटले.
स्वातंत्र्यानंतरचे जीवन
स्वातंत्र्यानंतर दुर्गा देवी गाझियाबादमध्ये राहून सामान्य जीवन जगू लागल्या आणि त्यांचे नाव विस्मृतीत गेले. त्यांनी लखनौच्या पुराना किला भागात गरीब मुलांसाठी शाळा उघडली. जी आता सिटी मॉन्टेसरी स्कूल म्हणून ओळखली जाते. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1956 मध्ये त्यांच्या शाळेला भेट दिली. दुर्गा देवींनी आपली जमीन शहीद शोध संस्थानसाठी दान केली. स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या या महिला क्रांतिकारीचे 15 ऑक्टोबर 1999 रोजी वयाच्या 92व्या वर्षी गाझियाबादमध्ये निधन झाले.
Join Our WhatsApp Community