तीन दिवसांपासून लंगडणाऱ्या रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू

153

सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे जखमी अवस्थेत लंगडणा-या रानगव्याचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. रानगव्याला सोमवारी वनाधिका-यांनी उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिका-यांकडे सोपवले होते. मात्र उपचाराअगोदरच रानगव्याने प्राण सोडल्याची माहिती मिळाली आहे. या रानगव्याला वेळेवर पकडून त्याला उपचार दिले असते तर तो वाचला असता अशी प्रतिक्रिया वन्यप्रेमींकडून दिली गेली.

नेमकी घटना काय

कामेरी गावानजीक आठवड्याभरापूर्वी गव्यांचा समूह आढळून आला होता. या घटनेनंतर तीन दिवसांपूर्वी समूह स्थलांतर झाल्यानंतर एक गवा गावातच राहिल्याचे दिसून आले. चार दिवसांपासून हा रानगवा लंगडतच फिरत होता. सोमवारी रानगवा चिखलात रुतून बसल्याने त्याला उठता येईना. अखेर जेसीबी मशिनच्या साहाय्याने गव्याची चिखलातून सुखरूप सुटका वनाधिका-यांनी केली. अंदाजे तीन ते चार वर्षांचा गवा एका पायाने लंगडत होता. मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान गव्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरीरात क्रिएटीन वाढल्याचे सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र गव्याच्या मृत्यूप्रकरणी वनाधिका-यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. या प्रकरणी सांगली वनविभागाकडून मौन बाळगण्यात आल्याने गव्याच्या उपचारास दिरंगाई करणा-या अधिका-यांवर काही कारवाई केली जाणार आहे का, याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.