आता फ्लाईटमध्ये अन् एअरपोर्टवर ऐकू येणार भारतीय संगीत!

आता देशातील विमानतळे आणि विमानांमध्ये भारतीय संगीत ऐकता येणार आहे. याबाबत इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिसर्चने नागरी उड्डाण मंत्रालयाला विनंती केली होती. त्यानंतर केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाधियांनी देशातील विमान कंपन्या आणि विमानतळ ऑपरेटर्सना यासंदर्भात पत्र पाठवले आहे.

…म्हणून वाजणार भारतीय संगीत

आपल्या पत्रामध्ये उषा पाधी यांनी लिहिले की, जगभरातील बहुतांश विमानांमध्ये त्या-त्या देशांतील सर्वोत्कृष्ट गाणी ऐकवली जातात. उदाहरण द्यायचे झाल्यास, अमेरिकी विमानांमध्ये जॅझ, ऑस्ट्रियाच्या विमानांमध्ये मोझार्ट आणि मध्य-पूर्व देशांमधील विमानांमध्ये अरबी संगीत ऐकवलं जातं. पण भारतीय विमानांमध्ये क्वचितच भारतीय संगीत ऐकायला मिळते. आपल्याला संगीताची समृद्ध अशी परंपरा लाभली आहे. शिवाय आपल्याला अभिमान वाटावा अशा देशातील कित्येक गोष्टींपैकी एक इथलं संगीत आहे. तरीही आपल्याकडे अशी स्थिती आहे.

(हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीवर काय म्हणाले संजय राऊत? जाणून घ्या…)

भारतीय संगीत ऐकवलं जात नसल्याने खेद

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी 23 डिसेंबर 2021 रोजी आयसीसीआरच्या मुख्यालयाला भेट दिली होती. आयसीसीआर ही भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे, जी परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. या संस्थेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी यावेळी शिंदे यांना आयसीसीआरतर्फे एक पत्र दिले. या पत्रामध्ये विमानांमध्ये भारतीय संगीत ऐकवलं जात नसल्याबाबत खेद व्यक्त करण्यात आला होता. या पत्रावर अनु मलिक, कौशल एस. इनामदार, मालिनी अवस्थी, शौनक अभिषेकी, मंजुषा कुलकर्णी-पाटील, संजीव अभ्यंकर, रिता गांगुली आणि वसीफुद्दीन डागर यांच्यासह अन्य गायक आणि संगीतकारांनी स्वाक्षरी केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here