-
ऋजुता लुकतुके
ऑगस्ट महिन्यात देशाची व्यापारी तूट २४.१६ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. मागच्या दहा महिन्यातील हा उच्चांक आहे. भारतात सणासुदीचे दिवस जवळ आलेत. पण, त्यामुळे देशातील आयात वाढून व्यापारी तूट जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये १७ टक्क्यांनी वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात देशातील आयात आणि निर्यातीत २४.१६ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी तूट होती. जुलै महिन्यात हीच तूट २०.६७ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती.
विशेष म्हणजे देशाची निर्यात आधीच्या तुलनेत सारखीच आहे. पण, आयात ८ महिन्यातील सगळ्यात जास्त आयात आहे. ऑगस्ट महिन्यात देशात ५८.६ अब्ज अमेरिकन डॉलरचा माल आयात झाला. विशेष म्हणजे आयातीत सगळ्यात जास्त प्रमाण हे सोने आयातीचं आहे. त्यामुळेच सणासुदीच्या हंगामामुळे आयातीत वाढ झाल्याचा अंदाज केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बार्थवाल यांनी व्यक्त केला आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यात भारताने ४.९ अब्ज अमेरिकन डॉलर मूल्याचं सोनं आयात केलं.
आयातीचं प्रमाण वाढलं असलं तरी समाधानी गोष्ट म्हणजे देशाची निर्यातही मागच्या तीन महिन्यातील उच्चांकी स्तरावर आहे. ऑगस्ट महिन्यात भारताने ३४.४८ अब्ज अमेरिकन डॉलरचा माल निर्यात केला. जगभरात पेट्रोलियम पदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे निर्यातीचं मूल्य कमी झाल्याचं वाणिज्य सचिवांचं म्हणणं आहे. निर्यातीचं प्रमाण वाढलंय. पण, जगभरातच तिचं मूल्य कमी झालंय, असं बार्थवाल यांनी म्हटलं आहे. उदाहरण देताना ते म्हणतात, ‘जगभरातच पेट्रोलियम पदार्थांची निर्यात ६ टक्क्यांनी वाढलीय. पण, पेट्रोलियम पदार्थांच्या किमती घसरल्यामुळे त्यांचं मूल्य २७ टक्क्यांनी घसरलंय.’
(हेही वाचा – Ind Vs Ban : बांगलादेश विरुद्ध ५ नवीन खेळाडूंना संधी दिल्याचं समर्थन रोहीत शर्मा का करतोय?)
शिवाय प्रगत देशांमध्ये अजूनही आर्थिक परिस्थिती पुरेशी स्थिर नाही. त्यामुळे भारतातून होणारी मौल्यवान खडे आणि दागिन्यांची निर्यातही ऑगस्ट महिन्यात मंदावली आहे. देशातून अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीत ८ टक्क्यांची वाढ झालीय. तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत २७ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. पण, निर्यात मूल्य बघितलं तर ते ९ अब्ज अमेरिकन डॉलर इतकंच आहे. येणाऱ्या दिवसांत भारत आणि युरोपीय देशांमधील व्यापार वाढणार आहे. त्यामुळे देशातील अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी युरोपीय बाजारपेठ आगामी काळात खुली होऊ शकते.
निर्यात चालना बोर्डाचे अध्यक्ष अरुणकुमार गरोडिया यांनी त्याविषयी बोलताना एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. ‘भारत आणि युरोपीय देश हे मध्य-पूर्व आशियाच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत. तशा कॉरिडॉरवरील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. तो पूर्ण झाला तर भारतीय वस्तूंसाठी युरोपीयन बाजारपेठ जवळ येईल. आणि भारतीय उद्योजकांसाठी संधी वाढतील. त्यामुळे युरोपातील आर्थिक वातावरण येणाऱ्या दिवसांत स्थिर राहिलं तर भारतासाठी संधी चालून येतील,’ असं गरोडिया पीटीआयशी बोलताना म्हणाले. भारत कृषि माल आणि औषधांचा मोठा जागतिक निर्यातदार देश आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community