MP MSRTC Bus Accident: एसटी बस नर्मदेत कोसळली, महामंडळाकडून हेल्पलाईन नंबर जारी

85

महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसला मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस सोमवारी सकाळी 10 वाजता नर्मदा नदीत कोसळली. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 50 हून अधिक लोक प्रवास करत होते. बसमधील 10 ते 12 प्रवासी बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून, या अपघातासंदर्भात अधिक माहितीसाठी एसटी महामंडळाने 022/23023940 हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे. त्याशिवाय जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनदेखील हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.

(हेही वाचा – एसटी अपघात : एकनाथ शिंदे यांनी केली मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा)

मदतीसाठी हेल्पलाईन नंबर

  • जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष – 02572223180, 02572217193
  • घटनास्थळी मदतीसाठी – 09555899091
  • एसटी महामंडळाचा संपर्कक्रमांक 022/23023940

या बसला झाला अपघात

Bus No MH40N9848
चालक- चंद्रकांत एकनाथ पाटील 18603
वाहक – प्रकाश श्रावण चौधरी 8755
मार्ग – इंदोर – अमळनेर
इंदोर हून सुटण्याची वेळ – 7:30
ठिकाण – खलघाट अणि ठीगरी मध्ये नर्मदा पुलावर

या अपघातामध्ये आतापर्यंत 13 लोक मृत्युमुखी पडले आहेत.त्यामध्ये एसटी महामंडळाच्या चालक -वाहकाचा समावेश आहे. तर या अपघातील 13 जणांपैकी 8 जणांची मृतांची ओळख पटली आहे.

महाराष्ट्र महामंडळाची ही बस सकाळी 7.30 च्या सुमारास मध्यप्रदेशातील इंदोरहून अमळनेरकडे निघाली होती. त्यावेळी बसमध्ये अचानक काही तांत्रिक बिघाड झाला आणि बस थेट खलघाट संजय सेतू पुलावरून 25 फूट नर्मदा नदीत कोसळली. यामध्ये बसमधील 13 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणांना वाचवण्यात यश आल्याचे मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले. बसमध्ये महाराष्ट्रातील कितीजण होते याची आकडेवारी अद्याप मिळू शकलेली नाही. एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. जळगाव, धुळेमधून अधिकारी पोहोचल्यानंतर अधिक माहिती मिळेल असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले आहे. एसटी बसच्या अपघाताची माहिती मिळताच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी घटनास्थळी एसडीआरएफला दाखल होण्याचे आदेश दिले असून, मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.