चेंबूरमधील सराईत गुंड चोर अण्णा उर्फ चेंबूर अण्णा याला पोलिसांनी अटक करून एका वर्षासाठी त्याला स्थानबद्ध करण्यात आले असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. चोर अण्णाला स्थानबद्ध करण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
खंडण्या उकळणे, लूटमार, जबरी चोरी, हप्ते वसुली करायचा
अजय मारीमुत्तू पेरीस्वामी उर्फ चोर अण्णा उर्फ चेंबूर अण्णा (२५) याची चेंबूर, वाशीनाका परिसरात दहशत असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. हत्यार बाळगणे, खंडण्या उकळणे, लूटमार, जबरी चोरी, वाटमारी, हप्ते वसुली, घरफोडी, चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या चोर अण्णाच्या दहशतीला स्थानिक नागरिक चळाचळा कापत होते. त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी कोणी पुढे आले, तर चोर अण्णा थेट त्याच्यावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करीत असे. त्यामुळे या चोर अण्णाच्या विरोधात कोणीही तक्रार देण्यास धजावत नव्हते.
(हेही वाचा ‘जस्सी’ने राखली लाज! जस्सी जैसी कोई नही…)
एमपीडीए कायदा अंतर्गत कारवाई
महिन्याभरापूर्वी चोर अण्णा याने एका महिलेकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली होती, या महिलेने पैसे देण्यास नकार देताच चोर अण्णाने खिशातून चाकू काढून या महिलेवर चाकूने हल्ला करून तिला मारहाण केली होती, त्यानंतर या महिलेजवळील पॆसे घेऊन निघून गेला होता. भररस्त्यात हा प्रकार सुरु असताना देखील चोर अण्णाच्या दहशतीमुळे या महिलेची मदत करण्यास पुढे कोणीही आले नाही. या महिलेने धाडस दाखवत आरसीएफ पोलिस ठाण्यात चोर अण्णा विरुद्ध तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोर अण्णा याच्याविरुद्ध एमपीडीए कायदा अंतर्गत स्थानबद्धची कारवाई सुरु केली होती. अखेर शुक्रवारी चोर अण्णा यांच्याविरुद्ध स्थानबद्धची कारवाईचा आदेश पोलिस उपायुक्त यांनी जारी करून शुक्रवारी त्याला अटक करून एक वर्षासाठी त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. चोर अण्णाला एका वर्षासाठी स्थानबद्ध केल्यामुळे स्थानिक नागरिकांची वर्षभरासाठी चोर अण्णा पासून सुटका झाली असून स्थानिक नागरिकांनी सुटेकेला निःश्वास सोडला आहे.
Join Our WhatsApp Community