संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून अंदाजे अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या मेप्को फॅक्टरी परिसरात उद्यानातील बिबट्या पुनर्वसन केंद्रात १७ बिबटे राहतात. येथील मधल्या विभागातील आठ पिंज-यात सहा बिबट्यांचे घर आहे.
बिबट्याला पुनर्वसन केंद्रात
केंद्राचा हा मधला विभाग उद्यानातील अधिका-यांच्या हृदयाचाही हळवा कोपरा आहे. या विभागात काही दिवसांची पिल्ले आता ३-४ वर्षांच्या तारुण्यात आली आहेत. चार वर्षांपूर्वी अहमदनगरमधून आपल्या भावासह आलेली तारा आता सर्वांचीच लाडकी आहे. आईपासून विभक्त झाल्याने काही दिवसांच्या भाऊ-बहिणींची रवानगी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात झाली होती. दोघांचेही जगणे अवघड असताना उद्यानातील अधिका-यांच्या प्रयत्नानंतर दोघेही जगले आणि सूरज आणि तारा या नावाने ओळखू लागले. २०१८ साली सूरजचा अकाली मृत्यू झाल्यानंतर महिन्याभराने उद्यानात आलेल्या बछड्याला अधिका-यांनी सूर्या असे नाव ठेवले. सूरजच्या आठवणीत सूर्या आणि तारा या चार वर्षांच्या बिबट्यांना वनाधिकारी डोळेभरुन पाहतात. मात्र सूर्या आणि बाजूच्या पिंज-यातील तीन वर्षांच्या बिट्टूमध्ये मैत्री फुलू लागली आहे. ठाण्यातील येऊरच्या जंगलात मॉर्निंग वॉकर्सला इवलुसा बिबट्याचा बछडा दिसला होता. या बिबट्याच्या बछड्याने डोळेही उघडले नव्हते. या बछड्याला आईच्या मिलनासाठी पाच दिवस प्रयत्नही झाले. अखेर प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर त्याला कायमचे बिबट्याला पुनर्वसन केंद्रात आणले गेले.
गेल्या वर्षी आरेत धुमाकूळ घालणारी दोन वर्षांची मादी बिबट्या या मधल्या विभागातील पिंज-यात राहते. तिला प्रमाने सर्वजण आर्या अशी हाक मारतात. आर्याची आपली शेजारीण ताराशी मैत्री आहे. मात्र आर्या आक्रमक स्वभावाची असल्याने वनाधिका-यांनी आतापर्यंत दोघींना एकत्र खेळू दिलेले नाही. सात महिन्यांच्या काळात अजूनही आर्याचा स्वभाव फारसा शांत झालेला नाही.
कोयना येथून सापडलेली ११ वर्षांची कोयना ही अंधत्वामुळे आपल्याच दुनियेत राहणे पसंत करते. उसाच्या शेतात लावलेल्या आगीत भाजलेल्या कोयनेचा एक डोळा निकामी झाला आहे. त्यावेळी कोयना फक्त वर्षभराची होती. डोळ्यावर शस्त्रक्रिया करुन पशुवैद्यकीय अधिका-यांनी संपूर्ण अंधत्वापासून वाचवले. मधल्या विभागातील सर्व बिबटे बाहेर खेळायला गेले की, कोयना त्यांच्या पिंज-यात फिरुन घेते. अधूनमधून तिलाही बाहेर फिरायला पाठवले जाते.