जे नियम वाहिनीला तेच ओटीटीला, काय म्हणाले जावडेकर?

ओटीटी प्लॅटफॉर्म आणि डिजिटल पोर्टलच्या बाबतीत लागू करण्यात आलेले नियम हे अशांतता पसरू नये म्हणून करण्यात आले आहेत, असेही जावडेकर यांनी सांगितले.

सध्याचं युग हे डिजिटल युग आहे. त्यामुळे पूर्वी अनेक कठीण वाटणा-या गोष्टी या आता केवळ एका क्लिकवर करणं सोपं झालं आहे. कोरोना काळात तर या डिजिटल युगाचा प्रत्येकाने खूप जवळून अनुभव घेतला. त्यामुळे डिजिटल भारत हेच भारताचे भविष्य आणि वर्तमान असणार आहे, असे माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म आणि डिजिटल पोर्टलच्या बाबतीत लागू करण्यात आलेले नियम हे अशांतता पसरू नये म्हणून करण्यात आले आहेत, असेही जावडेकर यांनी सांगितले.

काय म्हणाले जावडेकर?

सध्या ४० प्लॅटफॉर्मस् आहेत, ७०० चॅनल्स आहेत. पण त्यातून प्रसारित होणा-या गोष्टी या समाजविघातक असू नयेत, याकडे लक्ष ठेवणे हे सरकारचे काम आहे. म्हणून आम्ही ओटीटीसाठी नियम लागू केले आहेत. तक्रार केली तर त्या तक्रारीला उत्तर देण्याची कार्यपद्धती असणे गरजेचे आहे. यात कुणाच्याही स्वातंत्र्याचा संकोच करण्याचा हेतू नाही. तसेच ४० प्लॅटफॉर्मचे मिळून सहा जणांचे एक मंडळ तयार करण्यात यावे, जेणेकरुन कोणाच्याही तक्रारीकडे दुर्लक्ष झाले असेल तर त्याची या मंडळाकडून दखल घेतली जाईल. त्यावर सुनावणी होऊन त्या प्लॅटफॉर्म किंवा चॅनलला समज देण्यात यावी, यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही जावडेकर म्हणाले. जो नियम टीव्हीला तोच ओटीटीला, जो नियम वृत्तपत्रांना तोच डिजिटल पोर्टलला, याशिवाय काहीही वेगळे नियम करण्यात आलेले नाहीत. हे नियम स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी नाही तर, समाजस्वास्थ्य टिकवण्यासाठी करण्यात आले आहेत. समाजात तेढ निर्माण होऊ नये, अशांतता निर्माण होऊ नये म्हणून हे नियम करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचाः कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसी परिणामकारक!)

निर्णय घेणे शक्य झाले

डिजिटल माध्यमांमुळे जग जवळ आले आहे, याचा अनुभव कोरोना काळात आम्हाला शासनाचा कारभार होकताना मोठ्या प्रमाणात आला, असे जावडेकर म्हणाले. एका वर्षात कॅबिनेटच्या ५०हून अधिक बैठका या व्हर्च्युअल पद्धतीने घेण्यात आल्या. त्यामुळे कुठलाही निर्णय अडकला नाही आणि सातत्याने नवे निर्णय घेऊन कारभार करणे सोपे झाले, असे त्यांनी सांगितले.

कोट्यावधी शेतक-यांच्या खात्यात निधी जमा

१२ कोटी ३० लाख शेतक-यांना त्यांच्या खात्यात १० मिनिटांत पंतप्रधानांच्या एका क्लिकवर २ हजार रुपये जमा होतात. त्यामुळे मधली गळती संपूर्णपणे संपली आहे. गेल्या तीन वर्षांत जवळजवळ ३५ कोटी लोकांना १३ लाख कोटी रुपये डीबीटीच्या माध्यमातून पाठवण्यात आले. हा अनुभव गेल्या ७० वर्षांत कधीही आला नाही. तंत्रज्ञानाने जीवनात, राजकारणात मोठे बदल घडवले आहेत. तसेच आता डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून जास्तीत जास्त व्यवहार होताना दिसतात. त्यामुले कॅशलेस व्यवहार ही एक मोठी क्रांतीच म्हणावी लागेल, असंही प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. जवळपास ९० टक्के ग्राहक आजकाल डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून व्यवहार करतात. त्यामुळे सगळे व्यवहार हे पारदर्शक होण्यास मोठी मदत झाली आहे. भ्रष्टाचार संपण्यास मदत झाली आहे. या बदलाने जीवनात आमूलाग्र बदल होणार आहेत. नव्या गोष्टींच स्वागत करणं गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. ज्याचा तंत्रज्ञानावर विश्वास आहे तो नक्कीच क्रांती घडवून आणू शकतो, असा संदेशही त्यांनी दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here