डिजिटल सेवांकरता महापालिकेचे ‘इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी व्हिजन २०२५

158

मुंबई महानगरपालिकेच्या सर्व डिजीटल कामकाजामध्ये संगणकीकरणाला वेग देतानाच मुंबईकरांना पुरविण्यात येणाऱ्या डिजीटल सेवादेखील सुलभ, सक्षम आणि सुरक्षित करणे या उद्देशाने महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ‘इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी व्हिजन २०२५’ आखले आहे. त्याचे प्रकाशन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या हस्ते करण्यात आले.

( हेही वाचा : ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’चे ८४ टक्के काम पूर्ण, डिसेंबर २०२३ आधी सुरू होणार)

इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी व्हिजन २०२५

मुंबईकर नागरिकांना सर्व खात्यांनी एकसमान केंद्रस्थानी ठेवून उपयुक्त तंत्रज्ञानाचा वापर करणे या उद्देशाने महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ‘इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी व्हिजन २०२५’ धोरण आखावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी दिले होते. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान खात्याने हे धोरण तयार केले आहे. प्रामुख्याने पुढील ३ वर्षांमध्ये डिजीटल / संगणकीय कामे करताना कोणत्या बाबी पाळाव्यात, त्यासाठी मार्गदर्शक स्वरुपाची तत्वे या धोरणामध्ये नमूद करण्यात आली आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये साधारणतः सन २००० पासून संगणकीकरणाचा स्वीकार करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या सर्वच खात्यांमध्ये आता संगणकीय कामकाज केले जाते. बदलत्या काळानुसार मुंबईकर नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या अनेक नागरी सेवा-सुविधांमध्ये प्रामुख्याने दस्तावेजांमध्ये देखील संगणकीकरण करण्यात आले आहे. कोविड विषाणू संसर्ग कालावधी दरम्यान बैठकांपासून ते रुग्ण व्यवस्थापनापर्यंत प्रशासनाने सर्वत्र डिजीटल तंत्रज्ञानाचा उपयोग केला. दिवसेंदिवस कामकाजामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग वाढत असताना त्याला योग्य दिशा देणे, तांत्रिक फरक व उणिवा असल्यास त्या दूर करता याव्यात, याकरता हे धोरण असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

हे धोरण महानगरपालिका प्रशासनासाठी दिशादर्शक

मुंबई महानगर व मुंबईकर नागरिक यांचा केवळ आपल्या खात्यापुरता नव्हे तर संपूर्ण महानगरपालिका प्रशासनाच्या दृष्टीने साकल्याने विचार करुन तंत्रज्ञान अंमलात आणणे, महानगरपालिकेचा प्रत्येक विभाग आपापल्या स्तरावर डिजीटल तंत्रज्ञानाचा उपयोग करत असताना एकमेकांची प्रणाली वापरासाठी पूरक व अडथळाविरहीत ठरली पाहिजे, जागतिक स्तराच्या तुलनेत प्रशासन मागे राहू नये यासाठी अत्याधुनिक तांत्रिक बाबींचा सातत्याने स्वीकार करणे, केंद्र व राज्य सरकारने आखून दिलेल्या निकषांचे पालन करुन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्षात वापर होतो आहे यावर लक्ष देणे, तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आर्थिक काटकसर साध्य करणे, महसूलामध्ये वाढ करणे, महानगरपालिकेचे अंतर्गत व आस्थापनाविषयक सर्व कामकाज संगणकीकृत करणे अशी महत्त्वाची उद्दिष्ट्ये नजरेसमोर ठेवून हे धोरण आखण्यात आले आहे. तसेच संगणकीय कामकाजातून प्राप्त होणाऱ्या सांख्यिकीच्या आधारे योग्य नागरी व प्रशासकीय धोरण तयार करणे, संगणकीय प्रणालींमधून शक्य तेवढी कार्यवाही आपसूक होवून अडचणींचे आपोआप निराकरण होईल यावर भर देणे, जेणेकरुन मुंबईकर नागरिकांना सर्वोत्कृष्ट प्रकारची डिजिटल सेवा देता यावी, यावरही या धोरणामध्ये जोर देण्यात आला आहे. एकूणच, हे धोरण महानगरपालिका प्रशासनासाठी दिशादर्शक ठरणारे आहे.

संचालक (माहिती तंत्रज्ञान) शरद उघडे यांच्यासह माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य विश्लेषण अधिकारी शुभेंद्र कानडे, व्यवस्थापक राजेंद्र फणसे, अमीत गडेकर, अरुण चव्हाण, सहायक अभियंता डेनीस फर्नांडिस, सहायक अभियंता मीनल शेट्ये हे याप्रसंगी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.