ऐन तिशीतल्या आपल्या मुलाच्या नशिबी आलेल्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत कुटुंबातील तिन्ही सदस्यांनी अवयवदानाला संमती देत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला. नागपूरातील हतवार कुटुंबीयांनी आपला मुलगा गमावल्यानंतर अवयवदानासाठी पुढाकार घेतल्याने चार जणांना जीवनदान मिळाले.
( हेही वाचा : महाराष्ट्र झाला निर्बंधमुक्त; आता मास्क वापरणे ऐच्छिक, गुढीपाडवा शोभायात्रांना परवानगी )
कुटुंबीयांना दिली अवयवदानाची माहिती
स्वप्नील हतवार (३०) हा २९ मार्च रोजी दुपारी कामावरुन घरी परतताना उम्रेड मार्गावर त्याचा अपघात झाला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने स्वप्नीलला नागपूरच्या न्यूरोन रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यूरोन रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ चंद्रशेखर पाखमोडे यांनी स्वप्नीलला मेंदू मृत घोषित केले. रुग्ण मेंदू मृत अवस्थेत गेल्यानंतर मृत्यूपश्चात त्याच्या शरीरातील अवयव दान केल्यास प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना नवी जीवन संजीवनी मिळेल, ही माहिती दिली गेली. अवयव प्रत्यारोपण समन्वयिका वीणा वाठोरे यांनी अवयवदानाचे महत्त्व कुटुंबीयांना पटवून दिले.
स्वप्नीलचे आई-वडील अनंत हतवार आणि संध्या हतवार तसेच लहान बहिण आकांक्षा हतवार यांनी अवयवदानासाठी होकार दिला. न्यूरोन रुग्णालयातून अवयवदानासाठी नोंदणीकृत असलेल्या नजीकच्या एलेक्सिस रुग्णालयात स्वप्नीलला हलवण्यात आले. एलेक्सिस रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने संपूर्ण तपासणी करुन स्वप्नील मेंदू मृत असल्याची कागदोपत्री प्रक्रिया पार पडली. स्वप्नीलकडून मृत्यूपश्चात मिळालेले यकृत एलेक्सिस रुग्णालयातील गरजू रुग्णाला दिले गेले. दोन मूत्रपिंडांपैकी एक मूत्रपिंड एलेक्सिस रुग्णालयातील गरजूला तर दुसरे मूत्रपिंड वॉक्हार्ट रुग्णालयातील गरजूला दिले गेले. तसेच नेत्रदानही केले गेले.
Join Our WhatsApp Community