वीजेची तार लागून मुंबईचा पाहुणा जखमी…

148

मुंबईचा पाहुणा पक्षी असलेल्या फ्लेमिंगो पक्ष्याला विक्रोळीतील वीजेच्या तारेचा धक्का लागून उजव्या पंखाला जखम झाल्याची घटना घडली. २० जून रोजी ठाणे खाडीजनीक असलेल्या विक्रोळी भागांतील रहिवासी संकुलानजीकच्या भागांत फ्लेमिंगोची वीजेच्या तारेला धडक लागली. या अपघातात उजव्या पंखाची जखम बरी होण्यास वेळ लागत असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता फ्लेमिंगोच्या उपचाराची जबाबदारी सांभाळणा-या ‘रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर’ (रॉ) या वन्यजीवप्रेमी संस्थेकडून मिळाली. केंद्राकडून वीज कंपन्यांनी ठाणे खाडीतील ट्रान्समिशन लाईनजवळ पक्ष्यांचे लक्ष भटकवण्यासाठी ‘फ्लाइट डायव्हर्टर्स’ लावण्याचे आदेश दिल्यानंतर ही घटना उजेडात आली.

मानसिक स्थिती सुधारल्यावर शस्त्रक्रियेचा निर्णय

हिवाळ्याच्या ऋतुमानात मुंबईच्या किनारपट्टीला भेट देणारे फ्लेमिंगो पक्षी पावसाचा जोर वाढताच आपला मुक्काम आपल्या मूळ गावी हलवतात. फ्लेमिंगो हे स्थलांतरीत पक्षी म्हणून ओळखले जातात. मुंबईत ठाणे खाडीत अंदाजे ४० हजारांच्या संख्येने फ्लेमिंगो पक्ष्यांचा थवा डिसेंबर ते जून महिन्यापर्यंत आढळतो. फ्लेमिंगो पक्षी नजीकच्या भागांतून थव्यांसह जात असताना, एका पक्ष्याला वीजेच्या धक्क्याने जमिनीवर कोसळताना स्थानिकांनी पाहिले. याबाबत वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर जखमी फ्लेमिंगो पक्ष्याला उपचारासाठी ‘रॉ’ या प्राणीप्रेमी संस्थेकडे वनाधिका-यांनी दिले. ‘रॉ’ संस्थेच्या प्राणीप्रेमींनी जखमी फ्लेमिंगोला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा कट्याळ यांच्याकडे उपचारासाठी नेले. प्राथमिक उपचारासह फ्लेमिंगोच्या एक्सरे तपासणी केली गेली. फ्लेमिंगो हा पक्षी समूहात वावरतो. अपघातामुळे समूहापासून लांब गेल्याने तो प्रचंड घाबरलेला आहे. तणावात त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे  जिकरीचे ठरेल. त्यामुळे त्याची मानसिक स्थिती सुधारल्यानंतर, शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ‘रॉ’ या वन्यजीवप्रेमी संस्थेचे प्रमुख व ठाणे वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी दिली.

( हेही वाचा: बिबट्याचा न्यूमोनियाने मृत्यू? )

फ्लेमिंगो पक्ष्याच्या धोक्यास कारण की…

फ्लेमिंगो पक्ष्याचा अधिवास असलेल्या ठाणे खाडी परिसर हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील समजला जातो. या भागांजवळील मानवी वस्त्या आहेत. फ्लेमिंगो पक्षी हे स्थलांतरित असल्याने त्यांना उडताना मानवी हस्तक्षेपामुळे होणा-या समस्यांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. रॉ संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वीजेच्या धक्क्क्याने किंवा वीजेच्या तारेवर आदळल्याने फ्लेमिंगो पक्षी जखमी होण्याचे प्रमुख कारण आहे. कित्येकदा ट्रान्मिशन लाईनमुळेही फ्लेमिंगो पक्षी जखमी झाल्याने निरीक्षण ‘रॉ’ संस्थेने नोंदवले आहे. प्रत्येक दोन फ्लेमिंगो पक्ष्यामागे एक जखमी पक्षी जेव्हा उपचारासाठी येतो, त्यावेळी ही सर्व कारणे प्रामुख्याने आढळतात, असे ‘रॉ’ संस्थेने सांगितले. पंखांना होणा-या गंभीर जखमा कित्येकदा पूर्णपणे ब-याही होत नाहीत. त्यामुळे पक्ष्यांवरील अपघात टाळण्यासाठी पक्ष्यांचे लक्ष भटकवणारे फ्लाइट डायव्हर्टर्स त्वरित लावावेत, अशी मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.