नागपूर येथील देवलापूर येथे एकाच ठिकाणी खूप वेळ बसून राहिलेल्या बिबट्याला नागूपर ट्रान्झिट उपचार केंद्रातील अधिका-यांनी सुखरुपपणे जेरबंद केले. सायंकाळची वेळ असल्याने बिबट्याला पकडण्यासाठी बेशुद्ध करणे नियमबाह्य ठरते. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करुन त्याची रवानगी ट्रान्झिट उपचार केंद्रात करण्यात आली.
( हेही वाचा : समुद्रकिनारी गेल्यावर या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद नक्की घ्या… )
बारा मिनिटांत बचावकार्य पूर्ण
बिबट्याच्या डोक्याला, पायाला आणि ओठाला जखमा झाल्या होत्या. त्यामुळे देवलापूरमध्ये एकाच ठिकाणी तो बसून राहिला. याबाबत माहिती मिळताच स्थानिक वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले. नागपूर ट्रान्झिट उपचार केंद्राची टीम उपचार केंद्रातून निघाल्यानंतर घटनास्थळी दीड तासांनी दाखल झाली. तोपर्यंत बिबट्या जागेवरच होता. मात्र माणसांची गर्दी वाढताच तो काटेरी झुडूपात जाऊन लपला. त्याला पकडताना काहीजण खड्ड्यात पडले तर काहींना काट्यांचे ओरखडे पडले. शेवटी ट्रान्झिट उपचार केंद्रातील अधिका-यांनी हातांनीच काही मिनिटांत बिबट्याच्या बछड्याला पकडून जेरबंद केले. केवळ बारा मिनिटांत बचावकार्य पूर्ण झाल्याची माहिती नागपूर ट्रान्झिट उपचार केंद्राचे प्रमुख कुंदन हाते यांनी दिली.
बिबट्याच्या बछड्याच्या शरीरावरील जखमा जुन्या आहेत. त्याची प्रकृतीही नाजूक आहे. बछडा उपचारानंतर बरा होईल.
– कुंदन हाते, प्रमुख, नागपूर ट्रान्झिट उपचार केंद्र.
बचाव कार्यातील पथक
बचावकार्य नागपूर वनविभाग (प्रादेशिक)चे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. बचावकार्यात देवलापारचे वनपरिक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील, डॉ. सुदर्शन काकडे, डॉ. पूर्वा निमकर, सिद्धांत मोरे, वनरक्षक मुसळे, बंडू मगर, शुभम मंगर, विलास मंगर, स्वप्नील भुरे, चेतन भास्तर यांनी सहभाग नोंदवला.