नांदेड ते नागपूर… उपचारांसाठी बिबट्याचा सात तासांचा प्रवास

157

नांदेड येथील हिमायतनगर परिसरात सोमवारी दुपारी शेतात लंगडत चाललेला बिबट्या अचानक कोसळला. बिबट्याला भर दुपारी शेतात पाहिल्यानंतर शेतक-यांनी तातडीने वनाधिका-यांना घटनेची माहिती दिली. रात्री साडेदहानंतर बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले. बिबट्याला प्राथमिक उपचारानंतर मंगळवारी तातडीने नांदेडहून नागपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचारांसाठी रवाना करण्यात आले. या घटनेनंतर मराठवाडा तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र परिसरातील वन्यप्राण्यांच्या उपचारांसाठी जिल्हानिहाय ट्रान्झिट सेंटरच्या कामाची सुरुवात तातडीने केली जावी, अशी मागणी पुढे येत आहे. बिबट्या सायंकाळी उशिरापर्यंत नागपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात पोहोचण्याचा अंदाज आहे.

( हेही वाचा : T20 World Cup : सेमीफायनलमध्ये भारतासमोर इंग्लंडचे आव्हान; पण टीम इंडियाचे यामुळे वाढलंय टेन्शन)

नेमकी घटना काय

सोमवारी दुपारी चारच्या सुमारास हिमायतनगर येथील शेतात बिबट्या लंगडताना शेतक-यांना आढळला. जवळपास दोनशे मीटर अंतर लंगडत पार केल्यानंतर बिबट्या एकाच ठिकाणी निपचित पडून राहिला. बिबट्या जखमी असावा, या अंदाजाने वनाधिका-यांनी अगोदर त्याच्याजवळ सुरक्षित अंतराने त्याची पाहणी केली. सायंकाळची वेळ असल्याने त्याला पकडण्यासाठी बेशुद्ध करण्याचे ठरले. प्रत्यक्षात बिबट्याला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यासाठी रात्री साडेदहा वाजले. अंदाजे तीन वर्षांची मादी बिबट्या मागच्या पायाने लंगडत होती. तिच्या शरीरावर जखमा आढळल्या नाहीत. मादी बिबट्याला पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय अधिका-यांनी तपासले त्यानंतर मंगळवारी दुपारी एकच्या सुमारात तिला नागपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला पाठवण्याचा निर्णय झाला. सेंटरमध्ये बिबट्याची तपासणी झाल्यानंतर प्रत्यक्षात काय घडले, याची माहिती वनाधिका-यांना मिळेल. या घटनेनंतर नांदेडमध्ये ट्रान्झिट सेंटर उभारण्याची गरज पुन्हा समोर आली.

गेल्याच महिन्यात नांदेड जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या उपचारांसाठी ट्रान्झिट सेंटर उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. ट्रान्झिट सेंटरची जागाही वनाधिका-यांनी निवडली आहे. येत्या दोन वर्षांत ट्रान्झिट सेंटर उभारले जाईल, अशी आशा वनाधिका-यांना आहे. मराठवाड्यात बिबटे जखमी होण्याच्या घटना कमी असल्या तरीही हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत निलगाय, काळवीट आदी वन्यप्राण्यांना वाहनाची धडक लागणे, विहिरीत पडण्याच्या घटना सुरु असतात. या घटनांमध्ये जखमी वन्यप्राण्यांना उपचारासाठी मराठवाड्यात एकही ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर नाही आहे. नांदेडमध्ये त्वरित ट्रान्झिट सेंटर उभारले गेले तर नजीकच्या हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील वन्यप्राण्यांना उपचारासाठी नजीकचे केंद्र उपलब्ध होईल. त्यामुळे नांदेड येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला तातडीने निधी मिळावा, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.