बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात निरा या सहा महिन्यांच्या वाघाटीच्या मृत्यूप्रकरणात उद्यान प्रशासनाने चौकशी सुरु केल्याची माहिती वनसंरक्षक व संचालक जी. मल्लिकार्जून यांनी दिली. वाघाटीचा उपचारादम्यान मृत्यू झाला की, वाघाटीचा सांभाळ करताना हलगर्जीपणा झाला, याची माहिती चौकशी अहवालात घेतली जाईल.
( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या ताफ्यात दाखल होणार पहिली इलेक्ट्रिक AC डबल डेकर बस!)
उद्यान प्रशासनाची माहिती
वाघाटी या मांजरकुळातील सर्वात लहान आकाराच्या मांजराला वन्यप्राणी म्हणून गणले जाते. उद्यानातील पिंज-यात राहणा-या तीन वाघांटीपैकी एका वाघाटीचा ३ जून रोजी मृत्यू झाला. मृत्यूच्यावेळी वाघाटीला आकडी आली होती. सकाळी सहा वाजता वाघाटी प्राणीरक्षकांना आकडीसदृश्य स्थितीत दिसल्यानंतर उपचारासाठी हालचाली सुरु झाल्या. परंतु चार तासानंतर वाघाटीचा मृत्यू झाला. आकडी आल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते पुढील चार तासांच्या क्रमवारीची उद्यान प्रशासन माहिती घेत आहेत. उद्यानात पिंज-यातील प्राण्यांची संख्या लक्षात घेत पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्यासाठीही हालचाली सुरु असल्याची माहिती उद्यान प्रशासनाकडून दिली गेली. वन्यप्राणी हाताळण्यासाठी उद्यानातील प्राणी रक्षकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णयही उद्यान प्रशासनाने घेतला आहे. पुढील महिन्यापासून पुण्यातील ‘रेस्क्यू’ या प्राणीप्रेमी संस्थेकडे प्राणीरक्षकांना दोन ते तीन दिवस प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. हे प्रशिक्षण देण्यासाठी प्राणीरक्षकांची वेगवेगळी तुकडी टप्प्याटप्प्याने पाठवली जाईल, अशी माहिती उद्यानाचे वनसंरक्षक आणि संचालक जी मल्लिकार्जुन यांनी दिली.
Join Our WhatsApp Communityसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिका-याची नेमणूक करण्यासाठी उद्यान प्रशासन सकारात्मक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून पशुवैद्यकीय अधिका-याची नियुक्ती होईपर्यंत पशुसंर्धन विभागाकडून पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी मिळावा, यासाठी सातत्याने पत्रव्यवहार सुरु आहे. इच्छुकांनी उद्यान प्रशासनाकडे संपर्क साधल्यास निश्चितच नियुक्ती केली जाईल.
जी. मल्लिकार्जून, वनसंरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान