लष्करी संस्थांना प्रेरणा देऊन कौशल्य विकास तसेच तंत्रज्ञान विषयक विकासाबाबतच्या त्यांच्या प्रयत्नांना ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने केंद्रीय कौशल्यविकास मंत्रालयाने आयएनएस शिवाजी या नौदलाच्या तळाचा मंगळवारी सागरी अभियांत्रिकी विषयातील उत्कृष्टता केंद्र म्हणून गौरव केला आहे.
प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले
आयएनएस शिवाजी या तळावरील पायाभूत सुविधा तसेच उपलब्ध असलेल्या इतर सोयी, तसेच भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांची कौशल्ये सुधारण्याच्यादृष्टीने देण्यात येणारे प्रशिक्षण, मित्र देशांची नौदले आणि संपूर्ण व्यवस्था यांची काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतरच, ही मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता सचिव, आयएएस अधिकारी राजेश अगरवाल यांनी आयएनएस शिवाजीचे कमांडिंग ऑफिसर सीएमडीई अरविंद रावल यांना यासंबंधीचे प्रमाणपत्र प्रदान केले. यासंबंधीचे प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम मंत्रालयाच्या नवी दिल्ली येथील श्रम शक्ती भवनात करण्यात आला.
( हेही वाचा: आता मास्क लावला नाहीत, तर दंड आकारला जाणार नाही! पण…)
‘हा’ आहे उद्देश
आयएनएस शिवाजी हा महाराष्ट्रातील लोणावळा येथील नौदल तळ आहे. या तळावर असलेल्या नौदल अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतीय नौदल तसेच तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. एचएमआयएस शिवाजी येथे 15 फेब्रुवारी 1945 रोजी या संस्थेची स्थापना करण्यात आली. नौदलविषयक महत्त्वाचे तंत्रज्ञान, संशोधन तसेच विकासविषयक आणि मोठा नाव लौकिक असलेल्या इतर शैक्षणिक संस्थांशी सहकारी संबंध स्थापन करून दर्जा विषयक संशोधन करण्यासाठी प्रयत्न या उपक्रमांचा समावेश असलेल्या नियमावलीसह आयएनएस शिवाजी येथे 2014 मध्ये सागरी अभियांत्रिकी विषयक उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात आले. भारतीय नौदल, मित्र देशांची नौदले आणि संपूर्ण नौदल विषयक व्यवस्था यांच्यातील कर्मचाऱ्यांच्या कौशल्यात सुधारणा घडवून आणणे हा या उपक्रमाचा विस्तृत उद्देश होता.
Join Our WhatsApp Community