मुंबईतील सर्व पुलांची नियमित तपासणी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने तपासणी एजन्सीची नियुक्त करण्यात आली असून दर सहा महिन्यांनी प्रत्येक पुलांची तपासणी केली जाणार आहे. अंधेरीतील फडके रेल्वे पूल आणि फोर्टमधील हिमालय पुलाच्या दुघर्टनानंतर पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडीटसंदर्भातील मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानुसार या तपासणी एजन्सीची नियुक्ती करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
( हेही वाचा : माहिममध्ये बस स्टॉपच बनले डम्पिंग ग्राऊंड? )
या तपासणी एजन्सीची नियुक्ती शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या भागांसाठी नियुक्त केले असून या नियमित तपासणीत या पुलांमध्येही काही संरचनात्मक दोष आढळल्यास तसेच तीन वर्षांतून एकदा सर्व पुलाचे सखोल अर्थात जवळून तसेच एनडीटीचा वापर करून संरचनात्मक अहवाल तयार करणे अपेक्षित आहे.
नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेच्या अभियंत्यांमार्फत सर्व पूल, भुयारी वाहतूक मार्ग, पादचारी पूल, व स्कायवॉक आदींची तपासणी दर सहा महिन्यांनी अर्थात एप्रिल व ऑक्टोंबर महिन्यात करतील. म्हणजे पावसाळ्यापूर्व व पावसाळ्यानंतर पुढील पाच वर्षांकरता करतील. या बाबतचा प्रस्ताव पूल विभागाच्या माध्यमातून स्थायी समितीला सादर करण्यात आले होते, परंतु स्थायी समितीने या प्रस्तावांना मान्यता न दिल्याने हे प्रस्ताव आता प्रशासकाच्या माध्यमातून मंजूर केले जाणार आहे. त्यानंतर या एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे.
शहर भाग:
- पूल तपासणीसाठी नेमलेली संस्था : स्ट्रक्टॉनिक्स कन्सल्टींग इंजिनिअर्स
- निश्चित केलेली रक्कम : ५ कोटी ३९ लाख रुपये
पूर्व उपनगरे :
- पूल तपासणीसाठी नेमलेली संस्था : स्ट्रक्टॉनिक्स कन्सल्टींग इंजिनिअर्स
- निश्चित केलेली रक्कम : ५ कोटी ९६ लाख ४० हजार रुपये
पश्चिम उपनगरे
- पूल तपासणीसाठी नेमलेली संस्था : एससीजी सर्विसेस
- निश्चित केलेली रक्कम : ५ कोटी ४ हजार रुपये
अशाप्रकारे आहेत मुंबईतील परिमंडळांमध्ये पूल
- परिमंडळ एक : पुलांची संख्या ४४
- परिमंडळ दोन : पुलांची संख्या ५४
- परिमंडळ तीन : पुलांची संख्या ३३
- परिमंडळ चार : पुलांची संख्या ६९
- परिमंडळ पाच : पुलांची संख्या ८८
- परिमंडळ सहा : पुलांची संख्या ७९
- परिमंडळ सात : पुलांची संख्या ७६