रत्नागिरीत रांगोळीतून उमटले वीर सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग

190
रत्नागिरीत रांगोळीतून उमटले वीर सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग
रत्नागिरीत रांगोळीतून उमटले वीर सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग

रांगोळीच्या विविध छटांमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग रांगोळीकारांनी साकारले. या रंगावलीतून साक्षात वीर सावरकर प्रत्यक्ष उभे राहिलेत, असा भास होतो, असे गौरवोद्गार श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र ऊर्फ मुन्नाशेठ सुर्वे यांनी काढले. स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताहानिमित्त पतितपावन मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील विविध भागांसह रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वीर सावरकर विचार जागरण सप्ताह गेल्या २१ मेपासून सुरू झाला. तो २८ मेपर्यंत चालणार आहे. त्यात दुसऱ्या दिवशी जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा झाली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग स्पर्धकांनी रांगोळीतून साकारले.

(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट ही तीर्थयात्रा – राज्यपाल रमेश बैस)

पतितपावन मंदिरात ही स्पर्धा झाली. स्पर्धकांनी वीर सावरकर यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग रांगोळीतून साकारताना वीर सावरकर चरित्राची ओळख, अभ्यास याची चुणूक दाखवली. सकाळी १० ते ५ या वेळेत स्पर्धा झाली. संध्याकाळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष आनंद मराठे, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्टचे ट्रस्टी अॅड. विनय आंबुलकर, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र साळवी, राजन फाळके, गौरांग आगाशे, मनोज पाटणकर, पतितपावन संस्थेचे मंदार खेडेकर, परीक्षक कला शिक्षक, चित्रकर नीलेश पावसकर, प्रसिद्ध रांगोळीकर राजू भातडे, रांगोळीकार प्रशांत राजिवले, कलाकार श्रीकांत ढालकर, समन्वयक रवींद्र भोवड, रांगोळी स्पर्धा संयोजक अनघा निकम-मगदूम, सहसंयोजक मंगेश मोभारकर, तनया शिवलकर, केशव भट आदी उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असून २८ मे रोजी वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त पतितपावन मंदिरात आयोजित कार्यक्रमात याचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

पतितपावन मंदिरातील हे रंगावली प्रदर्शन २८ मेपर्यंत सकाळी १० ते १ व दुपारी ३ ते ६ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी येथे भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.