Swami Vivekananda Quotes On Education : शिक्षणाच्या सामर्थ्याविषयी स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी उद्गार

Swami Vivekananda Quotes On Education : कोलकात्ता विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत असताना, त्यांनी विविध विषयांबरोबरच पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि जगाचा इतिहास या विषयांचा सखोल अभ्यास केला होता. एकाग्रता ही ज्ञानसाधनेची गुरुकिल्ली आहे, असे विवेकानंदांचे मत होते.

387
Swami Vivekananda Quotes On Education : शिक्षणाच्या सामर्थ्याविषयी स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार
Swami Vivekananda Quotes On Education : शिक्षणाच्या सामर्थ्याविषयी स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार

‘उठा, जागे व्हा आणि ध्येयपूर्ती होईपर्यंत सतत कार्यरत राहा’ हा संदेश तुम्हा-आम्हा सर्वांना देणारे युवा संन्यासी स्वामी विवेकानंद यांच्या शिक्षणविषयक कार्याची ओळख आपण या लेखाच्या माध्यमातून करून घेणार आहोत. (Swami Vivekananda Quotes On Education)

स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता इथे एका अतिशय सधन कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते. ते कोलकात्ता उच्च न्यायालयात यशस्वी वकील होते. त्यांना विविध विषयांची आवड होती. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. त्या वृत्तीने धार्मिक आणि स्वभावाने अतिशय प्रेमळ होत्या. विवेकानंद त्यांच्या आईकडून अनेक गोष्टी शिकले. त्या नरेंद्रला महाभारत आणि रामायणातील गोष्टी सांगायच्या. नरेंद्रला लहानपणापासून संगीत, व्यायाम आणि अभ्यासाची आवड होती. त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती. त्यांच्या शिक्षकांनी एकदा वाचून दाखवलेला पाठ त्यांना समजत असे. त्यांना पशु-पक्ष्यांची आवड होती. विवेकानंद यांचे प्राथमिक शिक्षण मेट्रोपोलिटन इन्स्टिट्युट या शाळेत झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण सुरुवातीस एक वर्ष प्रेसिडेन्सी कॉलेज आणि नंतर स्कॉटिश चर्च कॉलेज या ठिकाणी झाले. १८८४ मध्ये त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली. जवळपास चार-पाच वर्षे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले होते. त्यांना अनेक वाद्य वाजवता येत होती. ते उत्तम गात. कोलकात्ता विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत असताना, त्यांनी विविध विषयांबरोबरच पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि जगाचा इतिहास या विषयांचा सखोल अभ्यास केला होता.

(हेही वाचा – Andhra University Distance Education : आंध्र विद्यापीठाच्या डिस्टन्स शिक्षण पद्धतीचे ‘हे’ आहेत ५ फायदे)

सन १८९३ मध्ये अमेरिकेत शिकागो (Chicago) इथे भरलेल्या सर्वधर्म परिषदेत त्यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले होते. ही परिषद त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. ११ सप्टेंबर १८९३ रोजी झालेल्या या परिषदेतील त्यांच्या उत्कृष्ट भाषणाने सर्व जगात भारताचा मान वाढला. नंतर जवळपास चार वर्षे त्यांनी अमेरिकेतील काही शहरांत, तसेच लंडन आणि पॅरिस इथे व्याख्याने दिली. जर्मनी, रशिया आणि पूर्व युरोपातील काही ठिकाणांना भेटी दिल्या. या प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेदांत तत्त्वज्ञानावर व्याख्याने दिली आणि प्रचार केला.

विवेकानंदप्रणित शिक्षणपद्धती

एकाग्रता ही ज्ञानसाधनेची गुरुकिल्ली आहे, असे विवेकानंदांचे मत होते. प्रयोगशाळेत काम करणारा वैज्ञानिक, योग साधना करणारा योगी, ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास करणारा खगोलशास्त्रज्ञ, ज्ञान प्राप्तीसाठी झटणारा विद्यार्थी, या सर्वांच्या नवनिर्मितीच्या मुळाशी एकाग्रता आढळते. एकाग्रता जेवढी अधिक तेवढे ज्ञानसंपादन अधिक होईल. कोणत्याही क्षेत्रातील यश हे एकाग्रतेचाच परिणाम असतो. कला, संगीत, इत्यादी बाबतीतील यश हे एकाग्रतेचेच फळ आहे. केवळ माहिती गोळा करणे म्हणजे शिक्षण नाही, तर शिक्षणाचे सार मनाच्या एकाग्रतेत आहे. एकाग्रता ही चिंतनातून विकसित होते. मनाच्या एकाग्रतेसाठी इंद्रियनिग्रही वृत्ती गरजेची असते. ज्ञानप्राप्तीसाठी एकाग्रतेबरोबरच श्रद्धाही आवश्यक आहे. श्रद्धा हेच विकासाचे मूळ आहे. मनुष्याच्या विकासात श्रद्धेचे स्थान महत्त्वाचे आहे. या श्रद्धेनेच माणूस बलवान अथवा दुर्बल बनतो. श्रद्धेचे पुनरुज्जीवन झाल्यास आपल्या पुढील प्रश्न आपण सहज सोडवू, असे विवेकानंद म्हणतात. एकाग्रता आणि श्रद्धा दोन शक्तींच्या जोरावर मानवाने आपला विकास केला आहे. विवेकानंदांनी शिक्षणप्रक्रियेत या दोन पद्धतींना विशेष महत्त्व दिले आहे.

शिक्षकाची भूमिका

शिक्षकाची मुख्य भूमिका ही विद्यार्थ्यास शिकण्यास साहाय्य करणे ही आहे. मूल स्वतःहून शिकत असते. ते शिकत असताना त्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेतील सर्व प्रकारचे अडथळे दूर करणे, हे शिक्षकाचे मुख्य काम आहे. त्यांच्यातील जिज्ञासा जागृत करणे महत्त्वाचे आहे. वनस्पतीची वाढ ही नैसर्गिकरीत्या होत असते. शिक्षकाची भूमिका ही बागेतील माळ्यासारखी असावी. माळी हा बागेतील रोपे वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतो. केवळ माहिती गोळा करणे आणि ती मुलाच्या मेंदूत कोंबणे हे शिक्षकाचे काम नाही, तर शिकण्यास अनुकूल स्थिती निर्माण करणे हे शिक्षकाचे काम आहे. विविध माध्यमांतून विद्यार्थी माहिती मिळवत असतात. शिक्षकांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेच्या दरम्यान विद्यार्थ्यास शिकण्यास मदत करणे, साहाय्य करणे, दिशा दाखवणे आणि प्रोत्साहन देणे, स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित होते. प्रत्येक मूल वेगळे आहे. त्यांच्या क्षमता आणि गरजा भिन्न आहेत. विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार शिक्षकांनी त्यांच्या अध्यापन पद्धतींत बदल केला पाहिजे. शिक्षकाकडे केवळ ज्ञान असून चालणार नाही, तर ते ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचवायचे हेही महत्वाचे आहे. अध्यापन करताना विद्यार्थ्याची पातळी लक्षात घेऊन, त्या पातळीवर जाऊन शिक्षकाला शिकवता येणे महत्त्वाचे आहे.

शिक्षक-विद्यार्थी संबंध

स्वामी विवेकानंद यांना गुरुकुल शिक्षणपद्धतीबद्दल (Gurukul education system) विशेष आदर होता. त्याकाळी ऋषिमुनी विद्यार्थ्यांना आश्रमातून शिकवत असत. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जात असे. शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात असायचे. त्या काळी विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नसे. आता मात्र आपण आधुनिक शिक्षणपद्धती स्वीकारली आहे. या बदलत्या पाश्र्वभूमीवर शिक्षक आणि विद्यार्थी संबंध कसे असावेत याविषयी विवेकानंदानी विचार मांडले आहेत. शिक्षकास त्याच्या विद्यार्थ्यांबद्दल अपार प्रेम, जिव्हाळा आणि सहानुभूती असावी. केवळ पैसा, नावलौकिक आणि प्रसिद्धी हा त्याचा हेतू असता कामा नये. शिक्षकास धर्मशास्त्रांचे ज्ञान अवगत असावे. ते ज्ञान सहज आणि सोप्या भाषेत मांडण्याचे कौशल्य त्याच्याकडे असावे. शिक्षक हा चारित्र्यसंपन्न असावा, तर विद्यार्थी हा विनयशील असावा. त्याला शिक्षकांबद्दल आदर असावा. त्याच्याकडे कष्ट करण्याची तयारी असावी. तो संयमी आणि सहनशील असावा. ज्ञानाची तीव्र लालसा आणि आत्मसंयमन हे गुण त्याच्याकडे असावेत.

स्त्री-शिक्षण

सुसंस्कृत स्त्रियांनी अध्यापनाचे कार्य करावे. त्यांनी गावोगावी आणि शहरांत शैक्षणिक केंद्रे उघडावीत. या केंद्रांतून स्त्री-शिक्षणाचा प्रसार करावा, असे विवेकानंद म्हणतात. आपल्या देशात मुलांच्या शिक्षणासाठी जेवढे लक्ष दिले जाते आणि काळजी घेतली जाते, तशी काळजी मुलींच्या शिक्षणाबाबत घेतली पाहिजे. त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. पक्षी आकाशात केवळ एका पंखाने उडू शकत नाही, त्यासाठी त्याला दुसरा पंख आवश्यक आहे. देशाची प्रगती फक्त पुरुषांच्या शिक्षणाने होणार नाही. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. प्राचीन काळी आपल्या देशात स्त्रियांना सन्मानाचे स्थान होते. स्त्रियांना शिकवा म्हणजे त्या स्वतः त्यांच्या समस्या सोडवतील. देशातील स्त्रीया शिक्षित झाल्या, तरच देशाची प्रगती होईल, असे ते म्हणतात.

लोकशिक्षण

सामान्य जनतेच्या शिक्षणाकडे झालेले दुर्लक्ष हे राष्ट्रीय पातक असून ते आपल्या हासाचे एक कारण आहे. जोपर्यंत सामान्य जनतेला चांगले शिक्षण, पुरेसे अन्न मिळत नाही आणि त्यांची योग्य ती काळजी घेतली जात नाही: तोपर्यंत कितीही राजकारण केले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. असे स्वामी विवेकानंद म्हणतात. त्यासाठी सामान्य लोकांत शिक्षणाचा प्रसार घडवून आणण्याचे ते आवाहन करतात. स्वामी विवेकानंद यांनी मातृभाषेतील शिक्षणाबरोबर संस्कृत (Sanskrit) भाषा शिक्षणाचाही पुरस्कार केला आहे. शिक्षण हे मातृभाषेतून दिले पाहिजे, याबाबत स्वामी विवेकानंद आग्रही होते.

आपले राष्ट्र झोपड्यांतून वसले आहे याचे विस्मरण होऊ देऊ नये. लोकांना सुशिक्षित करणे हाच त्यांच्या प्रगतीचा एकमेव मार्ग आहे, या गोष्टींची जाणीव विवेकानंदानी सुशिक्षितांना करून दिली. गरीब मुले शाळेत जाऊ शकत नसतील तर शाळेने त्यांच्यापर्यंत जावे, असे विवेकानंद यांनी सुचविले आहे. निःस्वार्थ भावनेने काम करणारे हजारोंनी धर्मोपदेशक, समाजसेवक आणि संन्यासी या देशात आहेत. या सर्वांनी त्यांच्याबरोबर कॅमेरा, पृथ्वीचा गोल, नकाशे इत्यादी साहित्य खेड्यात बरोबर न्यावे. या साधनांच्या साहाय्याने खगोलशास्त्र आणि भूगोल आदी विषयांचे ज्ञान तेथील मुलांना द्यावे. याशिवाय, इतिहास, भूगोल, विज्ञान आणि साहित्य या विषयांचे अध्यापन देखील करावे, असेही ते सांगतात.

धार्मिक शिक्षण

धर्म हा भारतीय जीवनाचा मूलाधार असून विज्ञान युगात होरपळणाऱ्या साऱ्या जगाला भारतातील अध्यात्म विचारांमुळे शांती लाभणार आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांनी भारताला अस्मितेची जाणीव निर्माण करून दिली आणि पाश्चात्य जगाला भारताचा परिचय करून दिला. भारतातील अध्यात्म आणि पाश्चात्यांचे आधुनिक विज्ञान यांच्या समन्वयातून उद्याची आदर्श मानव संस्कृती उदयाला येणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. थोर संतांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली पाहिजे, परंतू त्याचवेळी रूढी, अंधश्रद्धा आणि अज्ञान या गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या. दीनदुबळे आणि गरीब यांची सेवा हाच खरा धर्म, असे ते मानत.

स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांनी मांडलेले शिक्षणविषयक विचार आजही खऱ्या अर्थाने क्रांतिकारी म्हटले पाहिजेत. अजूनही महिला आणि बहुजन समाज यांच्या शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. अध्ययन- अध्यापन प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेशी संबंधित घटकांसंदर्भातील मुद्दे आजच्या परिस्थितीतही विचार करायला लावणारे आहेत.

संदर्भ ग्रंथ –

शैक्षणिक तत्त्वज्ञानाची रूपरेषा : ग. वि. अकोलकर

शैक्षणिक तत्त्वज्ञान व शैक्षणिक समाजशास्त्र : डॉ. म. बा. कुंडले

स्वामी विवेकानंद ते आचार्य विनोबा प्राचार्य रा. तु. भगत

मराठी विश्वकोश (Swami Vivekananda Quotes On Education)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.