जगात प्रत्येक देशाचे कोणत्या ना कोणत्या कारणावरुन आपल्या शेजारच्या देशांसोबत वाद आहेत. भारताचा पाकिस्तानसोबतचा जम्मू काश्मीरमुळे असणारा वाद तर जगजाहीर आहे. अशाच एका वादामुळे एका बेटाला दर सहा महिन्यांनी आपला देश बदलावा लागतो. या ऐतिहासिक बेटाविषयी आज आपण जाणून घेऊया.
जगातील या ऐतिहासिक बेटाचे नाव आहे फिझंट आयलंड. हे बेट फ्रान्स आणि स्पेन या दोन देशांच्या दरम्यान वसलेले आहे. फिझंट आयलंड हे जगातील सर्वात जुने काॅन्डोमिनियम आहे. सॅन सेबॅस्टियनच्या पूर्वेस, बिस्केच्या उपसागरापासून फक्त एक किंवा दोन मैलांवर फ्रान्स आणि स्पेनच्या सीमेदरम्यान बिडासोआ नदीत हे आयलंड आहे. या बेटाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बेटावर फ्रान्स आणि स्पेन या दोन्ही देशांचे हक्क आहेत. या बेटावर वर्षातील 6 महिने फ्रेंच सरकारची सत्ता असते तर उर्वरित 6 महिने स्पेनची. 1659 मध्ये पीयरनीसच्या करारावर स्वाक्षरी झाल्यापासून फिझंट आयलंडमध्ये अशीच स्थिती आहे.
विशेष म्हणजे हे जगातील सर्वात लहान काॅन्डोमिनियमदेखील आहे. कारण याचे क्षेत्रफळ फक्त 1.5 एकर इतके आहे. आपल्याकडील काही माॅलसुद्धा यापेक्षा मोठे आहेत.
( हेही वाचा: …नाहीतर आज गाड्यांना चमकणारे टायर्स असते )
…म्हणून दर सहा महिन्यांनी बदलतो देश
1659 मधील पीयरसीन करारापूर्वी जवळपास 30 वर्षे स्पेन आणि फ्रान्सच्या या बेटासाठी वाद सुरु होता. शेवटी फ्रान्स आणि स्पेनच्या प्रतिनिधींनी पीयरनीसमध्ये एकमेकांना भेटून समान हक्काच्या करारावर स्वाक्ष-या केल्या आणि 30 वर्षांचे यु्द्ध संपुष्टात आले. तेव्हापासून फ्रान्स आणि स्पेनने या बेटाचा मालकी हक्क सहा-सहा महिन्यांचा कालावधी वाटून घेतला.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात फ्रेंच प्रतिनिधी, फिझंट बेट स्पॅनियर्डसच्या स्वाधीन करण्यासाठी स्पॅनिश अधिका-यांना भेटतात. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात स्पॅनिश अधिकारी हेच बेट फ्रेंचच्या ताब्यात देतात.
युद्ध आणि पीयरसीन करारावर स्वाक्ष-या होण्याआधी फिझंट बेटाचा वापर एक तटस्थ ठिकाण म्हणून केला जात असे. फ्रेंच आणि स्पॅनिश सम्राटांमधील बैठका, कैद्यांची देवाणघेवाण करण्यासाठी या ठिकाणाचा वारंवार वापर केला जात असे. त्यामुळे या बेटाचे ऐतिहासिक महत्त्व आहे.
सध्या या फिझंट आयलंडचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पाण्याचा जोरदार प्रवाह आणि त्याच्या देखभालीतील निष्काळजीपणामुळे फिजंटचा सुमारे अर्धा भाग नष्ट झाला आहे. त्यामुळे या बेटाची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. नाहीतर हे ऐतिहासिक महत्त्व असणारे बेट काळाच्या ओघात नष्ट होईल.
Join Our WhatsApp Community